BREAKING
● 🔴 गोकुळ अध्यक्षपदाची निवडणूक २९ ऑक्टोबरला; 🔴 गोकुळचे संचालक सहलीवर; अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग 🔴 पदवीधर निवडणुकीत कोण मारणार बाजी? हर्षदा जाधव की स्मिता जाधव, राजकीय वर्तुळात चर्चा 🔴 शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? कौस्तुभ गावडे की जयंत आसगावकर, निकालाकडे लक्ष 🔴 कोल्हापुरात पाणीटंचाईचे संकट; नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांचा सामना 🔴 दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या; खरेदीसाठी नागरिकांची लगबग 🔴 केडीसी निवडणुकीत महायुतीची भूमिका काय असणार? जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष 🔴 गोकुळ, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकीय वातावरण तापले
]]>

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी कौस्तुभ गावडे यांचा शासनाकडे पाठपुरावा

कोल्हापूर : शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचा भार कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांनी केली आहे. शिक्षकांचा वेळ कागदपत्रे, ऑनलाइन नोंदी आणि वारंवार माहिती संकलित करण्यात खर्च होण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वापरला जावा, यासाठी शासन स्तरावर ठोस निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.




शाळांमध्ये अध्यापनासोबतच विविध प्रशासकीय कामे पार पाडण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता असून, शिक्षकांच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय सहाय्य व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता गावडे यांनी अधोरेखित केली.

शिक्षकांच्या कामाच्या ताणासंदर्भातील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणांचाही त्यांनी संदर्भ दिला. OECD च्या TALIS 2024 सर्वेक्षणानुसार, विविध शिक्षण व्यवस्थांमधील सरासरी ५२ टक्के शिक्षकांनी प्रशासकीय कामांना कामाशी संबंधित तणावाचे एक कारण मानले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षकांना अध्यापनासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

इंग्लंडमधील Teacher Workload Reduction Taskforce च्या धर्तीवर महाराष्ट्रातही शिक्षकांच्या कामाच्या स्वरूपाचा अभ्यास करून अनावश्यक कामांचा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी, अशी मागणी गावडे करणार आहेत. तसेच सिंगापूरमधील शालेय प्रशासकीय सहाय्य व्यवस्थेच्या धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये प्रशासकीय कामांसाठी स्वतंत्र कर्मचारी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढावा, उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा निश्चित करावी आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ शिक्षकांना मिळेल, याची खात्री करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“शिक्षकांनी शिकवावे, विद्यार्थ्यांनी शिकावे आणि शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांचा मौल्यवान वेळ अनावश्यक कागदपत्रे आणि पुनरावृत्तीच्या प्रशासकीय कामांमध्ये खर्च होण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वापरला गेला पाहिजे. यासाठी आवश्यक प्रशासकीय मदत आणि ठोस धोरणात्मक निर्णय व्हावेत, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा राहील,” असे कौस्तुभ गावडे यांनी स्पष्ट केले.

थोडे नवीन जरा जुने