NK NEWS मराठी
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा विश्वासार्ह वेध
पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी ताकदीने मैदानात उतरावे : रवींद्र चव्हाण
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्याच्या उद्देशाने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने कामाला लागावे. मतदारांशी थेट संपर्क साधून बूथस्तरीय यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भाजप जिल्हा कार्यालयात विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा आणि संघटनात्मक नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
प्रत्येक मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या निश्चित करून नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करावे आणि निवडणुकीच्या तयारीत कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे चव्हाण यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पाध्ये यांनी मतदान केंद्रनिहाय माहिती देत मार्गदर्शन केले. मतदारांशी किमान दोन ते तीन वेळा संपर्क साधणे, मतदार याद्यांचा आढावा घेणे तसेच बूथस्तरीय समन्वय मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखण्याची सूचनाही करण्यात आली.
या बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, सुरेश हळवणकर, महापौर रूपाराणी निकम, महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

