शिक्षक मित्र कौस्तुभ गावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा अर्ज सादर करण्यात आला.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती तसेच विविध भागांतील गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मोठे शक्तिप्रदर्शन न करता अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी स्वेच्छेने सहभागी झालेले शिक्षक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महिला शिक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
यावेळी कौस्तुभ गावडे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली. शिक्षकांची सेवा सुरक्षा, शैक्षणिक धोरणे आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी विधिमंडळात प्रभावीपणे आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक केवळ राजकीय प्रक्रिया नसून शिक्षकांच्या प्रश्नांना सक्षम प्रतिनिधित्व मिळवून देण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्ज दाखल करण्याच्या वेळी राजेश पांडे, आमदार महेश लांडगे, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिळीमकर, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. राजेंद्र शेजवळ, आर. के. भोसले, डॉ. श्रीराम साळुंखे, हातकणंगले पंचायत समितीचे सभापती यशवंत माने, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव एस. एम. गवळी, पुणे विभागाचे विभागप्रमुख अनिल साकोरे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे नेते, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि महिला शिक्षक उपस्थित होते.
