साखर कामगारांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा; आमदार सतेज पाटील कामगारांच्या पाठीशी
बीआयआर अॅक्ट पूर्ववत करावा, साखर कामगारांचे थकीत वेतन तातडीने द्यावे, बंद व आजारी साखर कारखाने सुरू करून कामगारांचे पुनर्वसन करावे, तसेच रोजंदारी व कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेऊन वेतनश्रेणी लागू करावी, या मागण्यांसाठी साखर कामगारांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला.
साखर कामगारांच्या प्रश्नांवर आमदार सतेज पाटील ठामपणे त्यांच्या सोबत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
साखर उद्योगातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. थकीत वेतन, बंद व आजारी कारखान्यांमुळे निर्माण झालेली रोजगाराची समस्या, तसेच रोजंदारी आणि कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांच्या सेवाशर्तींचा प्रश्न याकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रश्नांवर कामगार संघटनांनी सुरू केलेल्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या हक्कांशी संबंधित निर्णय घेताना सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करावी आणि प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. साखर कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या लढ्यात आमदार सतेज पाटील आणि काँग्रेस कामगारांच्या पाठीशी राहतील, असे प्रवीण केसरकर यांनी सांगितले.
