कोल्हापूर : पदवीधरांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावणे, शिक्षकांवरील अतिरिक्त कामांचा बोजा कमी करणे आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी व्यक्त केला. राजर्षी शाहू महाराजांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा वारसा पुढे नेत पदवीधर व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानपरिषदेत प्रभावीपणे आवाज उठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हर्षदा देशमुख-जाधव यांच्या उमेदवारीला पाठिंबा देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी, पेपरफुटी आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

पदवीधरांचा रोजगार, शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी विधानपरिषदेत प्रभावीपणे आवाज उठविण्याचा हर्षदा देशमुख-जाधव यांचा निर्धार.

देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न गंभीर बनले आहेत. सातत्याने समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे तरुणांच्या भविष्याबाबत चिंता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना योग्य प्रतिसाद देण्याऐवजी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराविरोधातील असंतोष या निवडणुकीत व्यक्त करण्याचे आवाहन नेत्यांनी केले.

दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित व अभ्यासू : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी हर्षदा देशमुख-जाधव या उच्चशिक्षित, अभ्यासू आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार असल्याचे सांगितले. तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी त्यांना विधानपरिषदेत पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार जयंत आसगावकर यांनीही आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय काम केले असून दोन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षणावर १०० टक्के निधी खर्च : सतेज पाटील

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील कामांचा आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झालेल्या संघर्षाचा आढावा घेतला. आमदार जयंत आसगावकर यांनी आपल्या आमदार निधीतील १०० टक्के निधी शिक्षण आणि शाळांच्या विकासासाठी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या पेन्शन योजनेसाठीचा लढा कोल्हापूरच्या भूमीतून तीव्र झाल्याची आठवण करून देत त्यांनी हर्षदा देशमुख-जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

हुकूमशाही रोखण्याची सुरुवात कोल्हापुरातून : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देशातील हुकूमशाही प्रवृत्ती रोखण्याची सुरुवात पुरोगामी कोल्हापुरातून होईल, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवडणूक परिवर्तनाची लढाई असल्याचे सांगत दोन्ही उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही दोन्ही उमेदवार सक्षम असून त्यांच्या विजयामुळे शिक्षण आणि शेती क्षेत्रातील प्रश्नांना बळ मिळेल, असे मत व्यक्त केले.

पदवीधर आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच

हर्षदा देशमुख-जाधव यांनी पदवीधरांच्या रोजगाराच्या संधी वाढविणे, शिक्षण क्षेत्रातील अडचणी दूर करणे आणि शिक्षकांना अतिरिक्त कामांच्या बोजातून दिलासा देणे यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणाच्या प्रश्नांसाठी आपला लढा सुरूच राहील, असे जयंत आसगावकर यांनी सांगितले.

मेळाव्याला मान्यवरांची उपस्थिती

या मेळाव्याला माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज पाटील, राजू लाटकर, व्ही. बी. पाटील, सारंग पाटील, विजय नाडकर, प्रभाकर देशमुख, राजू आवळे, शिवाजी खांडेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.