NK News मराठी
कोल्हापुरात लोकप्रिय बनत चाललेले News Channel
शिक्षक-पदवीधरांची ताकद जयंत आसगावकरांच्या पाठीशी
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचाराला कोल्हापुरातून जोरदार सुरुवात झाली आहे. गेल्या सहा वर्षांत शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या आसगावकरांच्या पाठीशी शिक्षक आणि पदवीधरांची मोठी ताकद असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या कार्यात विजय दडलेला असून, विरोधकांना त्यांचा पराभव करणे अशक्य असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ रविवारी कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी कार्यालयात महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रा. जयंत आसगावकर यांच्या कामाचा गौरव करत त्यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जयंत पाटील यांनी सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका करत शिक्षक, विद्यार्थी आणि पदवीधरांमध्ये असंतोष असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये पुण्यातील शनिवार वाड्यासमोर जाहीर चर्चा व्हावी, असे आव्हानही त्यांनी दिले. या चर्चेतून कोणाचा अभ्यास आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका अधिक ठोस आहे, हे जनतेसमोर येईल, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही प्रा. जयंत आसगावकर यांच्या कार्याचे कौतुक केले. आसगावकर यांनी आपल्या आमदार निधीतील १०० टक्के निधी शाळांच्या विकासासाठी आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांतील शाळांना प्रिंटर, संगणक आणि स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या कामाचा उल्लेख करत, हीच कामगिरी त्यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनीही महाविकास आघाडीच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला. शिक्षक आणि पदवीधरांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना योग्य संदेश दिला जाईल, असे ते म्हणाले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी गेल्या सहा वर्षांत प्रा. जयंत आसगावकर यांनी शिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवल्याचे नमूद केले.
या मेळाव्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शिक्षक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या सहा वर्षांतील कामाचा अनुभव, शाळांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने मांडलेली भूमिका या मुद्द्यांवर प्रा. जयंत आसगावकर यांची प्रचारमोहीम केंद्रित होत आहे. त्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
