कोल्हापूर : नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याच्या भावनेतून फुलेवाडी येथील अनुराधा देसाई यांनी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा फुलं देऊन सन्मान केला. त्यांच्या या उपक्रमातून महिलांप्रती आदर, आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. याच भावनेतून समाजातील कष्टकरी आणि कर्तव्यनिष्ठ महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम अनुराधा देसाई यांनी राबवला. रस्त्याच्या कडेला फुलं विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिला, उन्हातान्हात मेहनत करणाऱ्या कष्टकरी महिला, रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर व परिचारिका तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांना त्यांनी फुलं देऊन सन्मानित केले.

दैनंदिन जीवनात अनेक महिला विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. कुटुंबाचा आधार बनण्यापासून ते समाजाच्या सेवेसाठी अहोरात्र कार्य करण्यापर्यंत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कष्टांची आणि सेवाभावाची दखल घेत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत अनुराधा यांनी हा उपक्रम राबवला. या छोट्याशा कृतीतून महिलांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नवरात्रीचा उत्सव केवळ देवीच्या पूजेपुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करण्याची प्रेरणा देणारा ठरावा, हा या उपक्रमामागील संदेश आहे. देवीची पूजा मंदिरात करतानाच आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक महिलेच्या कष्टांचा, कर्तृत्वाचा आणि अस्तित्वाचा आदर केला पाहिजे. नवरात्रीत स्त्रीशक्तीचा गौरव करताना वर्षभर महिलांना सन्मानाची वागणूक देणे हीच खरी शक्तीची उपासना असल्याचा विचार अनुराधा देसाई यांच्या या उपक्रमातून व्यक्त झाला.