सोलापूर : ‘हवा कुणाचीही असू दे, वादळ आमचंच!’ असा विश्वास व्यक्त करत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. सोलापुरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात निवडणुकीच्या प्रचाराची दिशा आणि नियोजनावर चर्चा करण्यात आली.

“

हवा कुणाचीही असू दे, वादळ आमचंच! दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन.

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार जयंत आसगावकर यांचे काम आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व ही महाविकास आघाडीची जमेची बाजू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आघाडीची भूमिका आणि उमेदवारांचे काम प्रभावीपणे मांडावे, असे आवाहन करण्यात आले.

शिंदे आणि मोहिते-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते एकत्र आल्याने प्रचाराला बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शिक्षक आणि पदवीधर मतदारांशी संपर्क वाढवून दोन्ही मतदारसंघांत विजय मिळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचा निर्धार मेळाव्यात करण्यात आला.