जि.प. सदस्या मानसी भोगण यांच्या पुढाकारातून वाल्मिकी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोवाड, ता. चंदगड : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कोवाड येथील वाल्मिकी निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या कु. मानसी कल्लाप्पाणा भोगण यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव वाय. बी. पाटील होते, तर माजी आमदार राजेशदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण हेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषद सदस्या मानसी भोगण यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष एल. एस. पाटील, मुख्याध्यापक कडगावकर, विनोद पाटील, सूर्यकांत पाटील, एस. एल. पाटील, राजू जाधव, भोमाणी पाटील, नारायण कणूशकर, राजेंद्र मिंगुडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक व शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

