NEET पेपरफुटी प्रकरण: कोल्हापुरातील संशयास्पद खासगी क्लासेस आणि अकॅडमीजची चौकशी करा; शिवसेना उपनेते संजय पवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
कोल्हापूर :
NEET (NEET-UG) २०२६ ची परीक्षा पेपरफुटीच्या आरोपांमुळे रद्द करण्यात आली असून ३ मे २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे यादीत पुरावे समोर आल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने (NTA) ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात दुर्दैवाने महाराष्ट्रातील पुणे, लातूर आणि नाशिक येथील कनेक्शन समोर आले असून काही प्राध्यापक आणि अकॅडमीज मधील लोकांना अटक करण्यात आले आहे. NEET परीक्षा रद्द होणे हे केंद्र सरकार आणि NTA चे मोठे अपयश असून, या भोंगळ कारभाराचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांना बसणार आहे. रात्रंदिवस अभ्यास करून, क्लासेसची भरमसाठ फी भरून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातात. मात्र सरकारने झटकाऱ्यात परीक्षा रद्द करून दोन दोन वर्षांच्या मेहनतीवर पाणी ओतले आहे. परीक्षा परत घेतली ही जाईल, मात्र यामुळे विद्यार्थ्यांना एक प्रकारे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. देशातील कित्येक विद्यार्थ्यांनी अशा परिस्थितीमुळे आत्महत्या केल्याचे दिसून येत असल्याने ही अत्यंत गंभीर बाब बनली आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणी खासगी क्लासेस अथवा अकॅडमीज यांचे रान उठले आहे. यामध्ये प्रामुख्याने मोटेगावकर क्लासेस, चाटे क्लासेस, गरुड झेप अकॅडमी, ॲलन अकॅडमी व त्यासोबत अनेक इतर अकॅडमीज यांची काही शिक्षण संस्थांशी असलेली मिलीभगत आणि आर्थिक व्यवहारांची तसेच बँक खात्यांची चौकशी झाली पाहिजे. ज्या पालकांनी फी स्वरूपात खासगी क्लासेसना लाखो रुपये भरले आहेत, ती फी पालकांना तातडीने कोणतीही आढेवेढे न घेता परत केली पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने ती वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, Maharashtra शासनाने जबाबदारी स्वीकारून कोल्हापूरसह महाराष्ट्रातील सर्व RCC मोटेगावकर येथे शिकवणी घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची फी तात्काळ परत करावी. तसेच RCC मोटेगावकर याची ई.डी. (E.D.) आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रातील RCC कोचिंग क्लासेस मधील सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे शासन स्तरावर जबाबदार अधिकारी यांचे मार्फत समुपदेशन करावे, जेणेकरून अशा बिकट परिस्थितीमध्ये सदर लोकांना मानसिक आधार देता येईल. कोल्हापूर शहरातील काही खासगी क्लासेस व अकॅडमीज यांचे शिक्षण संस्थांशी असलेले आर्थिक आणि व्यावसायिक संबंध काय आहेत, याची संपूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने पितळी गणपती, ताराबाई पार्क येथील अनॲकॅडमी (UNACADEMY) आणि महावीर कॉलेजचे संबंध, राजारामपूरी २ री गल्ली येथील संजय घोडावत अकॅडमी आणि शाहू दयानंद महाविद्यालय व महावीर कॉलेजचे संबंध, राजारामपूरी ५ वी गल्ली येथील किशोर करिअर पॉईंट आणि कोल्हापूर हायस्कूलचे संबंध तसेच शाहूपुरी येथील आयआयबी अकॅडमी (IIB Academy) आणि शाहू दयानंद महाविद्यालयाच्या संबंधांची चौकशी व्हावी. यासोबतच पॅव्हेलियन हॉटेल जवळ असलेले आरसीसी मोटेगावकर अकॅडमी आणि शाहू दयानंद महाविद्यालय, शिवाजी पार्क येथील पॅन्टॅगॉन अकॅडमी आणि महावीर कॉलेज, रेल्वे फाटक शेजारील आकाश अकॅडमी आणि महावीर कॉलेज, तसेच रेल्वे फाटक शेजारीलच इन्स्पायर अकॅडमी (Inspire Academy) आणि शाहू दयानंद महाविद्यालय यांच्यातील संबंधांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादरीकरण व उपस्थित पदाधिकारी:
जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करताना शिवसेना उपनेतेSanjay Pawar, विजय देवणे, मंजीत माने, अवधूत साळोखे, रणजीत आयरेकर, युवराज खंडागळे, प्रसाद कुलकर्णी, राजू यादव, भीमराव पाटील, उदय सुतार, अक्षय घाटगे, दीपक गौड, दिलीप देसाई, अक्षय मोरे, शांताराम पाटील, संतोष रेडेकर, अभी दाभाडे, राहुल माळी, सुमित मेळवंकी, शुभम पाटील, किशोर दाभाडे, धनाजी यादव, राहुल गिरोले, महादेव कुकडे आणि सॅम गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
