BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

स्थायी समिती बैठकीत शहरातील पाणी, नालेसफाई, रस्ते व भूमिगत केबल प्रश्नांवर जोरदार चर्चा

महानगरपालिका वृत्त | स्थायी समिती बैठक
महापालिका स्थायी समिती गुरुवार, २९ मे २०२६

स्थायी समिती बैठकीत शहरातील पाणी, नालेसफाई, रस्ते व भूमिगत केबल प्रश्नांवर जोरदार चर्चा

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी (दि. २९ मे २०२६) पार पडली. बैठकीत शहरातील पाणीपुरवठा, नालेसफाई, रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी प्रश्न, पॅचवर्क, बेकायदा खुदाई तसेच भूमिगत केबल टाकण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली. विविध सदस्यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडत प्रशासनाला धारेवर धरले.

बैठकीतील मुख्य मंजुरी व निर्णय:

  • बिद्री सबस्टेशन ते काळम्मावाडीपर्यंत भूमिगत केबल टाकण्यासाठी सुमारे १९ कोटी ३९ लाख रुपयांच्या प्रस्तावाला शासनाकडे निधीसाठी सादर करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.
  • विषय क्रमांक ७ आणि ८ ला किमान वेतन लागू करण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सदस्यांचे प्रश्न आणि प्रशासनाचा खुलासा

इंद्रजित बोंद्रे दुधाळी येथील धुण्याच्या चावीचे पाणी सुरू करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला.
प्रशासनाचा खुलासा: राजघाट परिसरातील जुना व्हॉल तांत्रिक कारणांमुळे सुरू करण्यात अडचणी येत आहेत. व्हॉल तुटल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने कामासाठी वेळ लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अमर समर्थ शहरातील हातगाड्यांवर कचरा कर आकारणीबाबत विचारणा केली.
प्रशासनाचा खुलासा: प्रत्येक हातगाडीसाठी दरमहा ४०० रुपये प्रमाणे वसुली करण्याच्या सूचना आरोग्य निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.
प्रतापसिंह जाधव पंचगंगा हॉस्पिटलमधील दुरवस्था आणि बंद पडलेल्या सोनोग्राफी मशीनचा मुद्दा उपस्थित केला.
प्रशासनाचा खुलासा: डॉक्टरांच्या कमतरतेमुळे प्रसूतीचे प्रमाण कमी असल्याने शासनाच्या योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात अडचणी येत आहेत. तसेच सोनोग्राफी मशीन चालवण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुन्हा जाहिरात काढण्यात येणार आहे.
पूर्वा राणे श्याम सोसायटी परिसरातील सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळत असल्याचा गंभीर मुद्दा मांडला व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीची माहिती दिली.
प्रशासनाचा खुलासा: अमृत योजनेअंतर्गत कामे सुरू असून, त्या भागासाठी १ एमएलडी क्षमतेचा प्लांट डीपीडीसीकडे (DPDC) प्रस्तावित करण्यात येणार आहे.
राजनंदा महाडीक बापत कॅम्पमधील अपुरा पाणीपुरवठा आणि ११ मारुती मंदिर परिसरातील झाडांच्या फांद्यांचा प्रश्न उपस्थित केला.
प्रशासनाचा खुलासा: पाणीपुरवठ्यासाठी अंदाजपत्रक तयार केले असून निधीची आवश्यकता आहे. झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी वृक्षप्राधिकरणाची मंजुरी घेतली जात आहे.
अमर समर्थ पावसाळा तोंडावर असतानाही शहरातील पॅचवर्कची कामे संथगतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाचा खुलासा: पाणी साठणाऱ्या भागांना प्राधान्य देऊन पॅचवर्कची कामे करण्यात येणार आहेत.
नेहा तेंडुलकर जिवबा नाना पार्क, नवीन वाशी नाका आणि मोरे मानेनगर परिसरातील रस्ते व ड्रेनेज प्रश्नावर आवाज उठवला.
प्रशासनाचा खुलासा: संबंधित ठिकाणी पॅचवर्क सुरू असून प्रलंबित ड्रेनेज काम दोन दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले.
अभिजीत मोकाशी सम्राटनगरमधील १२ मीटर रस्त्यावरील अतिक्रमण तसेच तोरणानगर येथे बांधकामासाठी पाणी चोरी केल्याचा आरोप केला व कर्मचाऱ्यांवर बोट ठेवले.
प्रशासनाचा खुलासा: यामध्ये पाणीपुरवठा विभागातील संबंधित कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित बांधकामधारकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अनेक सदस्य दुधाळी परिसरातील गेल्या दोन वर्षांपासून न उचललेला गाळ, अपूर्ण नालेसफाई आणि अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नसल्याचा मुद्दा उठवला.
निर्देश व खुलासा: यावर सोमवारी विशेष आढावा बैठक घेण्याचे निर्देश सभापतींनी दिले. प्रशासनाने शहरातील नालेसफाई युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला.
अर्चना पागर सर्किट हाऊस ते रिटोनिया अपार्टमेंट परिसरातील पाणीपुरवठा समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली व दोन महिन्यांपासून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
प्रशासनाचा खुलासा: संबंधित ठिकाणी रेड्यूसर सापडला असून पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण केले जाईल.
आदिल फरास ठेकेदारांकडून कामानंतर रस्ते, गटारे आणि ड्रेनेज चेंबर व्यवस्थित न बसवल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत असल्याचा मुद्दा मांडला.
प्रशासनाचा खुलासा: या समस्येची गंभीर दखल घेत चारही विभागीय कार्यालयांकडून तत्परतेने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.

बैठकीतील इतर महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय

खुदाईसाठी परवानगी बंधनकारक: यापुढे कोणत्याही कंपनीला शहरात खुदाई करण्यासाठी स्थायी समितीची परवानगी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोडोमीटर कमी दाखवून प्रशासनाची दिशाभूल होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

संरक्षक जाळ्या बसविणे: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले आणि कॉलनी चॅनेलवर संरक्षक जाळ्या बसविण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यासाठी तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

सदस्य निधीतील कामे: सदस्यांच्या निधीतील कामे अद्याप सुरू न झाल्याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त झाली. यावर शासन अनुदानातील कामांना मंजुरी देण्यात येत असून महापालिकेच्या स्वनिधीतील कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन
मे २०२६
थोडे नवीन जरा जुने