प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : सीपीआरमध्ये जिल्ह्यातील प्रत्येक रुग्ण आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे सर्व आवश्यक आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथे सुमारे २५० कोटी रुपयांच्या विविध अत्याधुनिक सेवा-सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधांमुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना दर्जेदार आणि आधुनिक उपचार सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रूपाराणी निकम उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, डॉ. अजित लोकरे, स्थानीय नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, १९८५ साली उभारलेल्या इमारतीचा कायापालट करण्याचे भाग्य मला लाभले. सीपीआर रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे आधारवड आहे. येथील सेवा-सुविधांचे आधुनिकीकरण करून रुग्णांना महानगरांप्रमाणे उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नव्याने सुरू झालेल्या सुविधा रुग्णांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच सामान्य रुग्णांना सर्व आरोग्य सुविधा आता जिल्ह्यातच मिळतील. एकही रुग्ण बाहेर जाणार नाही, अशा सुविधा शहरात पूर्णत्वास येतील.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, समाजसेवेची जाण असणारा आरोग्यदूत म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दोन हजार कोटी रुपयांचा निधी आणून आरोग्य सेवेचे वैभव त्यांनी उभे केले आहे. महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक रुग्णाला कुटुंबातील सदस्य समजून आरोग्य सेवा देण्याचे आवाहन उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्ह्यात वाढत असलेल्या आरोग्य सेवा ही आनंदाची आणि स्वाभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी पुढील काळात स्वप्नवत उभारलेली ही शासकीय वास्तू जपून निरंतर आरोग्य सेवा देण्याचे आवाहन केले.
लोकार्पण करण्यात आलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा
आरआयसीयू व पल्मनरी लॅबोरेटरी
श्वसनविकारांच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी आणि फुफ्फुसासंबंधी आजारांच्या निदान व उपचारांसाठी इंटेन्सिव्ह रेस्पिरेटरी केअर युनिट. येथे १० बेड, व्हेंटिलेटर सुविधा आणि मल्टीपॅरा मॉनिटर उपलब्ध.
मेडिकल आयसीयू युनिट (MICU)
अत्यवस्थ रुग्णांसाठी तात्काळ उपचाराकरिता ४० बेड, अत्याधुनिक व्हेंटिलेटर सुविधा आणि मल्टीपॅरा मॉनिटरची स्वतंत्र सक्षम यंत्रणा सज्ज.
सर्जिकल आयसीयू युनिट (SICU)
अपघातग्रस्त आणि गंभीररीत्या अत्यवस्थ रुग्णांसाठी विशेष तज्ज्ञ देखरेखीखाली १६ बेड, व्हेंटिलेटर यंत्रणा आणि सर्जिकल मल्टीपॅरा मॉनिटरची उभारणी.
रोबोटिक आर्मयुक्त फिजिओथेरपी लॅब
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच शासकीय रुग्णालयात! रोबोटिक आर्मद्वारे फिजिओथेरपी सुविधा, रोबोटिक गेट ट्रेनिंग सिस्टम तसेच ऑक्युपेशनल थेरपीसाठी यंत्रसामग्री.
फार्माकोजेनोमिक लॅब आणि इतर प्रगत विभाग
अत्याधुनिक संशोधन आणि अचूक औषधोपचारासाठी उपयुक्त फार्माकोजेनोमिक लॅबसह पूर्णपणे अद्ययावत केलेला कान, नाक व घसा (ENT) विभाग सुरू.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली, ज्यानंतर सर्व नूतन सुविधांची सविस्तर पाहणी करण्यात आली. प्रारंभी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी प्रास्ताविक करून रुग्णालयातील नव्या सुविधा आणि सुरू असलेल्या एकूणच विकासकामांची माहिती दिली. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन डॉ. भूषण मिरजे यांनी केले. त्यानंतर नव्याने विभागात भरती झालेल्या गट चार मधील पात्र कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे अधिकृत वितरण करण्यात आले.
