सीपीआर नूतनीकरण वास्तूचे मे अखेरीस मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन होणार - मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात - 'कोल्हापूरचा श्वास' या नुतणीकरण वास्तूचे लोकार्पण येत्या मे अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
"सीपीआर रुग्णालय हे जनतेच्या सेवेसाठी नवीन अत्याधुनिक व देखण्या स्वरूपात सुरू होत आहे. मुख्यमंत्री महोदयांची तारीख मिळाल्यानंतर याचे उद्घाटन करण्यात येईल."
- मंत्री हसन मुश्रीफ
शेंडा पार्क येथील सभागृहात मंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विभागाचा आज आढावा घेतला. ते म्हणाले, शेंडा पार्क येथे सुरू असलेले १२५ निवासी स्त्री / पुरुष डॉक्टरांचे निवासी वसतीगृह, प्रत्येकी १५० मुला / मुलींचे वसतीगृह, बॅडमिंटन व टेबल टेनिस कोर्ट, विश्रामगृह नूतनीकरण त्याचबरोबर MBBS चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जुन्या वसतिगृहाचे नूतनीकरण तसेच १५० नर्सिंग क्षमता असलेल्या होस्टेल व प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेऊन हे काम येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या कागल, उत्तुर, शेंडा पार्क त्याचबरोबर इतर ठिकाणी सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये पाणी, रस्ता, वीज त्याचबरोबर एसटीपीची (सिव्हेज ट्रिटमेंट प्लॅन्ट) कामे प्राधान्याने करण्यात यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीत घेण्यात आलेला सविस्तर आढावा:
वैद्यकीय व आरोग्य वास्तू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क, सीपीआर रुग्णालय आणि सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुरल ट्रेनिंग सेंटरचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नवीन आगामी महाविद्यालये
उत्तुर येथे उभारण्यात येत असलेले योग व निसर्गोपचार महाविद्यालय आणि पिंपळगाव येथे सुरू असलेल्या शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
बैठकीला उपस्थित असलेले प्रमुख अधिकारी व कंत्राटदार:
- डॉ. सदानंद भिसे (अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)
- डॉ. गिरीश कांबळे
- डॉ. शिशिर मिरगुंडे (वैद्यकीय अध्यक्ष)
- मानसिंग जगताप (प्रशासकीय अधिकारी)
- डॉ. भाग्यश्री खोत (अधिष्ठाता, योग व निसर्गोपचार महाविद्यालय)
- हर्षदीप घाटगे (जल अभियंता, मनपा)
- रोहित तोंदले (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)
- संबंधित विभागाचे इतर अधिकारी आणि कंत्राटदार
