कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरच्या विकासात मैलाचा दगड ठरेल
आंतरराष्ट्रीय दर्जाला आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर | दि. १३ एप्रिल २०२६प्रगतीचा नवा अध्याय
कोल्हापूर जिल्हा हा आसपासच्या सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी सह सीमा भागाशी निगडीत असून, या सर्वांचे केंद्र स्थान कोल्हापूर आहे. कोल्हापूर जिल्हा विविध कलागुणांना वाव देणारा जिल्हा असून, कोल्हापूर जिल्ह्यात इंजिनीअरींग असोसिएशन, आर्किटेक्ट असोसिएशन, डॉक्टर्स असोसिएशन, बार कोन्सील अशा विविध संघटना या ठिकाणी कार्यरत आहेत.
परंतु, विविध संघटनांच्या सामुहिक बैठका, विचारांचे अदान-प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण याकरिता एखादा जाहीर कार्यक्रम, बैठक, पत्रकार परिषद आयोजित करण्यासाठी शासनाचे अधिकृत कोणतेही केंद्र जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे विचारांचे आदान- प्रदान, सांस्कृतिक देवाण-घेवाण यावर मर्यादा येत आहेत. यावर पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक सोयी सुविधांनी युक्त आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर निर्मिती करण्याची मागणी मी केली होती.
"तत्कालीन मुख्यमंत्री आणि सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करून प्रशासकीय मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली होती. येत्या काळात या सेंटरमुळे औद्योगिक, पर्यटन, सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल."
राजाराम तलाव येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या कामाची पाहणी करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबधित अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाच्या कामात कोणताही विलंब होऊ नये, तो दिलेल्या मुदतीतच पूर्ण व्हावा, कामाचा दर्जा उत्कृष्ठच असावा, यामध्ये कोणतीही हयगय चालणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- 🔹 २००० आसनक्षमतेचे सभागृह
- 🔹 १५०० आसनक्षमतेचे ॲम्फीथिएटर
- 🔹 भव्य बँक्वेट आणि कॉन्फरन्स हॉल
- 🔹 अत्याधुनिक एक्स्झीबिशन सेंटर
- 🔹 सुसज्ज कॅफेटेरिया
- 🔹 २ वर्षात काम पूर्ण होण्याचा अंदाज
उपस्थित मान्यवर व अधिकारी
- डॉ. राजेंद्र भारुड (महापालिका आयुक्त)
- तुषार बुरुड (अधिक्षक अभियंता, PWD)
- रोहित तोंदले (कार्यकारी अभियंता)
- रमेश मस्कर (शहर अभियंता)
- एन एस पाटील (शहर नगर रचनाकार)