लेखक: अजय शिंगे | न्यूजकट्टा विशेष

हाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका 'व्हिडिओ'ने जे वादळ निर्माण केले आहे, त्याने केवळ एका नेत्याची झोप उडवली नाही, तर संपूर्ण राजकीय संस्कृतीलाच एका कठड्यावर आणून उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे दिग्गज नेते नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर वणव्यासारखा पसरला आहे.

दोन महत्त्वाच्या बाजू: जर हा व्हिडिओ सत्य असेल तर काय? आणि जर तो पूर्णपणे बनावट किंवा 'फेक' असेल तर काय? या दोन्ही शक्यतांचा विचार करणे गरजेचे आहे.

पर्याय १: जर व्हिडिओ सत्य असेल तर...

लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी हा समाजाचा आदर्श असतो. जर एका जबाबदार मंत्र्याचा अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कृत्यात सहभाग सिद्ध झाला, तर ती महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेली मोठी काळीमा ठरेल. सार्वजनिक जीवनात वावरताना घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या कृतीचा परिणाम तरुणाईवर होत असतो. अशा परिस्थितीत नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांना बाजूला व्हावे लागेल.

धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणांनंतर जनतेमध्ये आधीच संतापाची लात आहे.

पर्याय २: जर व्हिडिओ 'डीपफेक' असेल तर...

आज आपण AI आणि 'डीपफेक' (Deepfake) तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत, जिथे कोणाचाही चेहरा आणि आवाज हुबेहूब कॉपी केला जाऊ शकतो. जर नरहरी झिरवाळ यांच्यासारख्या ज्येष्ठ आदिवासी नेत्याला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले असेल, तर ते अत्यंत भयानक आहे. राजकारणात चारित्र्यहनन करणे हा प्रभावी मार्ग समजला जातो, अशा वेळी झिरवाळ हे एका 'हनी ट्रॅप' किंवा ब्लॅकमेलिंगचे बळी ठरले आहेत का? याचा शोध घेणे गरजेचे आहे.

"केवळ एका व्हिडिओच्या आधारावर कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसून ती एक वैचारिक दहशतवाद आहे."

निष्कर्ष आणि जनतेची अपेक्षा

झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार असून आदिवासी पट्ट्यात त्यांचा मोठा प्रभाव आहे. या प्रकरणातील 'सत्य' हे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातच दडलेले आहे. जर हा व्हिडिओ वास्तव असेल, तर ते नैतिक अध:पतन आहे आणि जर ती अफवा असेल, तर ते लोकशाहीचे विद्रुपीकरण आहे. सत्याच्या बाजारात अफवांचा बळी जाऊ नये, हीच अपेक्षा!