BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

आपण मात्र सोशल मीडियावर गुंग.

रुपयाची घसरण - विशेष लेख | NewsKattaa

रुपयाचा ९५ कडे प्रवास: राजकारणाच्या धुंदीत हरवलेले आर्थिक मरण

विशेष लेख | मार्च २०२६
१ डॉलर = ९४.८६ भारतीय रुपये

आपण मात्र सोशल मीडियावर गुंग....??

ध्या आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे? टीव्ही लावल्यास राजकीय चिखलफेक, कोणाचे तरी घर फोडल्याचे राजकारण, खोट्या प्रतिष्ठेची युद्धे आणि सोशल मीडियावर एकमेकांना तुच्छ लेखण्याची स्पर्धा. सामान्य माणूस या गोंधळात इतका गुंग झाला आहे की, त्याच्या खिशातून होणारी चोरी त्याला दिसत नाहीये. पण शांत डोक्याने मोबाईलच्या स्क्रीनवर डॉलरचा आकडा पहा.

"ही केवळ आकडेवारी नाही, हे एका मध्यमवर्गीय स्वप्नाचे सरण आहे. ही घसरण केवळ रुपयाची नाही, तर तुमच्या मुलांच्या शिक्षणाची, तुमच्या ताटातील भाजीची आणि तुमच्या भविष्यातील बचतीची आहे."

आपण ज्या राजकारणात आणि 'आमचा नेता मोठा की तुमचा' या वादात अडकलो आहोत, त्यातून बाहेर येऊन एकदा बाजारपेठेकडे नजर टाका. रुपयाची ही ऐतिहासिक घसरण म्हणजे एक शांत, अदृश्य पण अत्यंत भयानक भूकंप आहे. जेव्हा रुपया ९५ च्या उंबरठ्यावर पोहोचतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, जागतिक बाजारपेठेत भारतीय चलनाची किंमत मातीमोल होत चालली आहे.

महागाईचा वणवा आणि सामान्यांचे जगणे

सर्वात आधी भीती कशाची वाटायला हवी? तर ती म्हणजे 'महागाईच्या वणव्याची'. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक खनिज तेल परदेशातून आयात करतो. कालपर्यंत ज्या तेलासाठी आपण ८०-८२ रुपये डॉलरच्या हिशोबात मोजत होतो, आज त्यासाठी थेट ९५ रुपये मोजावे लागत आहेत. तेल महागले की डिझेल महागते. डिझेल महागले की मालवाहतूक महागते. मग ती कोल्हापूरच्या मार्केटमधील भाजी असो, गव्हाचे पोते असो वा औषधे; प्रत्येक गोष्टीची किंमत वाढणार आहे.

विचार करा: आज ९५ वर गेलेला हा आकडा जर उद्या १०० पार गेला, तर सामान्य माणसाने जगायचे कसे?

या आर्थिक संकटाचा सर्वात मोठा तडाखा आपल्या तरुणाईला बसणार आहे. जे मध्यमवर्गीय बाप आपल्या मुलाला परदेशात शिकायला पाठवण्याचे स्वप्न बघत आहेत, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. फी चे आकडे रात्रीतून लाखांनी वाढले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे, त्यांच्या डोक्यावर व्याजाचा डोंगर उभा राहिला आहे.

विश्वगुरू की व्हेंटिलेटरवर?

एकीकडे आपण 'विश्वगुरू' होण्याच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे आपले चलन व्हेंटिलेटरवर आहे. परकीय गुंतवणूकदार आपला पैसा काढून घेत आहेत. शेअर बाजार कोसळत आहे. जेव्हा रुपया कमकुवत होतो, तेव्हा देशाची प्रतिष्ठा जागतिक पातळीवर ढासळते. ज्या देशाचे चलन स्थिर नाही, तिथे गुंतवणूक करायला कोणीही धजावत नाही.

"मंदीचा हा फेरा जेव्हा तुमच्या दारात येईल, तेव्हा तुम्हाला हे राजकारण, या निवडणुका आणि या जातीय-धार्मिक भिंती आठवणार नाहीत. तेव्हा फक्त आठवेल तो रिकाम्या खिशाचा जाळ."

ही भीती घालण्यासाठी नाही, तर जागे करण्यासाठी आहे. आपण जेव्हा एखाद्या राजकीय नेत्यासाठी रस्त्यावर उतरतो किंवा सोशल मीडियावर पोस्ट लिहितो, तेव्हा हे विसरतो की त्याच वेळी आपल्या घरच्या बजेटचे तीन-तेरा वाजले आहेत. रुपयाची ही ९५ कडे होणारी धाव आपल्या सर्वांना दारिद्र्याच्या खाईत ढकलणारी आहे.

जागे व्हा, कारण हे संकट केवळ अस्तित्वाचे आहे!

आता तरी आपण या राजकीय धुंदीतून बाहेर पडणार आहोत की नाही? हा रुपयाचा उतरता आलेख आपल्या आत्मसन्मानाचा उतरता आलेख आहे

थोडे नवीन जरा जुने