पुष्पा पाटील/कोल्हापूर
अनुसूचित जातीच्या (SC) आरक्षित जागांवर खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणूक लढवून घटनात्मक आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कोल्हापुरात एल्गार पुकारण्यात आला आहे. 'अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समिती'च्या वतीने येत्या सोमवारी, ९ मार्च २०२६ रोजी शहरात भव्य 'संघर्ष महामोर्चा' काढण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
आरक्षणाची चोरी आणि प्रशासकीय संगनमत
समितीने दिलेल्या माहितीनुसार, पट्टणकोडोली येथील जिल्हा परिषद सदस्य श्री. दरगोंडा बसगोंडा पाटील (महेश पाटील), गडहिंग्लजचे नगराध्यक्ष श्री. महेश महादेव तुरबतमठ आणि इचलकरंजीच्या नगरसेविका सौ. अलका अशोक स्वामी यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या दाखल्यांच्या आधारे निवडणुका जिंकल्या आहेत. हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नसून खऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांच्या हक्कांवर आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर झालेला मोठा आघात आहे, अशी तीव्र भावना समितीने व्यक्त केली आहे.
या गैरप्रकारात केवळ लोकप्रतिनिधीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणारे आणि अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे दाखले देणारे महसूल अधिकारीही दोषी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, अप्पर तहसीलदार महेश खिलारे, हातकणंगलेचे कार्यकारी दंडाधिकारी सुशील बेलेकर, गडहिंग्लजचे ऋषिकेत शेळके आणि एकनाथ काळबांडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या:
१. संशयास्पद लोकप्रतिनिधींची अनुसूचित जातीची प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांची पदे बरखास्त करावीत.
२. खोट्या प्रमाणपत्रांद्वारे शासनाची व निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याबद्दल संबंधितांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
३. दोषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या बेनामी संपत्तीची तपासणी करावी.
४. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी जात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक आणि पारदर्शक करावी.
समाज बांधवांना सहभागी होण्याचे आवाहन
आरक्षण हा अनुसूचित जातीचा घटनात्मक हक्क असून तो वाचवण्यासाठी बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी, बुरुड यांसह सर्व पोटजातींमधील समाज बांधवांनी, महिलांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे. ९ मार्च रोजी होणारा हा मोर्चा आरक्षणाची चोरी करणाऱ्यांना आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या प्रशासनाला चपराक देणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या पत्रकार परिषदेला उत्तमदादा कांबळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक दुर्वास बापू कदम, पॅंथर शिवाजीराव कवाळे, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, डॉ. शरद गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वैभव प्रधान यांनी उपस्थितांचे आभार मानले.

