कोल्हापूर: 'शाळा सुटली, पाटी फुटली' असे म्हणत ५० वर्षांपूर्वी एकमेकांचा निरोप घेतलेले मित्र पुन्हा एकदा एकत्र आले. निमित्त होते प्रायव्हेट हायस्कूलच्या १९७५-७६ सालच्या बॅचच्या सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळाव्याचे. तब्बल पाच दशकांनंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने सर्वांचे डोळे पाणावले होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. विभूते गुरुजी आणि कै. जोशी गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेची प्रार्थना म्हणताना सर्वजण पुन्हा एकदा विद्यार्थीदशेत हरवून गेले. या प्रसंगी उपस्थित गुरुजन बी. जी. देशपांडे, जगदाळे सर, मीरा करकरे-सहस्त्रबुद्धे आणि शोभा नवनीहाळकर-कुलकर्णी यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राजीव दिवाण यांनी वर्षभर परिश्रम घेऊन हुबळी, मुंबई, पुणे, ठाणे अशा विविध शहरांत विखुरलेल्या ६० मित्र-मैत्रिणींचा शोध घेतला. परिचयाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर चेहऱ्यांवरील सुरकुत्या मागे पडून बालपणीचे 'ते' सवंगडी एकमेकांसमोर उभे राहिले. शकील जमादार यांनी सादर केलेल्या गाण्यांनी आणि कव्वालीने कार्यक्रमात विशेष रंगत भरली.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन उदय सांगवडेकर यांनी केले, तर प्रास्ताविक राजीव दिवाण यांनी मांडले. दत्तात्रय आफळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नसीर अत्तार, डॉ. विजय हिराणी आणि अतुल भाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सौ. सुनिता लठ्ठे, सौ. अलका देसाई, सौ. कांचन कसबेकर, तिलोत्तमत्ता लाड, सौ. रेखा माळकर, जगदीश लठ्ठे, रघुनाथ घाटगे, राजेंद्र कुलकर्णी, राहुल सुगंधी, धनाजी कोथमीरे, दिलीप देशिंगे, शांताराम कांबळे, जयेश ओसवाल, अजित खैरे यांसह ५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. 'पुन्हा लवकरच भेटू' या खात्रीसह जड अंतःकरणाने सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
