मुंबई: कर्नाटक काँग्रेसच्या नेत्या आणि पुद्दुचेरीच्या प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पदयात्रेदरम्यान एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. माहिम परिसरात ही पदयात्रा सुरू असताना एका लहान मुलीचा जीव थोडक्यात बचावला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. निंबाळकर यांची पदयात्रा माहिममधून जात असताना एका चिमुरडीने त्यांना प्रेमाने गुलाबाचे फूल भेट दिले. फूल देऊन ती मुलगी बाजूला जात असतानाच मागून एक भरधाव गाडी आली. अचानक आलेल्या गाडीमुळे ती चिमुरडी प्रचंड घाबरली आणि तिने तात्काळ डॉ. अंजली निंबाळकर यांना घट्ट मिठी मारली. हा प्रसंग इतका अनपेक्षित होता की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.
या घटनेनंतर डॉ. निंबाळकर यांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे. "वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास असे जीवघेणे प्रसंग घडणार नाहीत," अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र या संवेदनशील क्षणाने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे.
