कोल्हापूर (प्रतिनिधी):
कोल्हापूर महानगरपालिकेच्या १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आरोग्य विभागातील आशा सेविकांचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने, त्यांनी आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत महापालिकेवर मोर्चा काढला.
निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सेवेची जबाबदारी या आशा सेविकांनी चोखपणे पार पाडली होती. मात्र, निवडणूक होऊन दीड महिना उलटला तरी त्यांना मिळणारा भत्ता आणि मानधन प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. या आर्थिक ओढगस्तीमुळे संतप्त झालेल्या शेकडो आशा सेविकांनी एकत्र येत महापालिका प्रशासनाचा तीव्र निषेध केला.
महापौर रुपाराणी निकम यांची ग्वाही
या मोर्चाच्या ठिकाणी महापौर सौ. रुपाराणी संग्रामसिंह निकम यांनी स्वतः भेट देऊन आंदोलक आशा सेविकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आशा सेविकांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर, महापौरांनी प्रशासकीय पातळीवर तातडीने पाठपुरावा करून प्रलंबित मानधन आणि भत्ता लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाईल, अशी ठोस ग्वाही दिली. महापौरांच्या या आश्वासनानंतर आशा सेविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

