BREAKING
वेताळ तालीम मंडळा'ने पटकावला मानाचा 'महापौर चषक' 🔴 साखर निर्यात बंदी: केंद्र सरकारकडून सप्टेंबर २०२६ पर्यंत साखर निर्यातीवर बंदी कायम; कोल्हापूरच्या कारखानदारांमध्ये चिंतेचे वातावरण. 🔴 शक्तीपीठ महामार्ग: महामार्गाच्या विरोधात जिल्ह्यातील ७९ गावांमधील शेतकऱ्यांचा एल्गार; नवीन अधिसूचनेवर हरकती घेण्यास सुरुवात. 🔴 महापालिका अपडेट: व्यावसायिक परवाना नूतनीकरणासाठी महापालिकेकडून एक महिन्याची मुदतवाढ; व्यापाऱ्यांना मोठा दिलासा. 🔴 उड्डाणपूल रखडला: तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपुलाचे काम तांत्रिक कारणास्तव लांबणीवर; सल्लागार नियुक्तीत पेच. 🔴 राजकीय हालचाली: कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग; सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष. 🔴 गुन्हेगारी: शेअर मार्केटमधील नुकसान भरून काढण्यासाठी स्वतःच्या घरात चोरीचा बनाव रचणारा निवृत्त जवान राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात. 🔴 व्याघ्र प्रकल्प विरोध: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरला ५५० गावांतील ग्रामस्थांचा विरोध; विकासावर परिणाम होणार असल्याचा दावा. 🔴 ऐतिहासिक स्मारक: कसबा बावड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी. 🔴 हवामान इशारा: कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका ४० अंशांच्या पार; येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाची शक्यता
]]>

स्त्रीवाद : अंतःस्वर की आक्रोश ?

स्त्रीवादाचा आवाज उठतो तेव्हा तो फक्त घोषणांचा गोंगाट नसावा; तो एक अंतःस्वर असावा स्वतःला शोधणारा, स्वतःचे अस्तित्व घडवणारा. पण आज अनेकदा हा स्वर पुरुषाविरोधी ठरतो. स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याऐवजी “पुरुष करतो तेच आम्हीही करू” हा केवळ तुलनात्मक आग्रह अधिक दिसतो. यातून स्त्रीची उंची गाठली जात नाही; उलट ती पुरुषाच्या छायेचा पाठलाग करत राहते.


स्त्रीच्या शरीराच्या वैशिष्ट्यांचा गौरव नाकारता येणार नाही. मातृत्व, पोषण, जीवननिर्मिती या तिच्या अद्वितीय देणग्या आहेत. पण या देणग्यांचे उदात्तीकरण करून पुरुषाशी तुलना केली जाते, तेव्हा विचाराचे हे टोक अतिशयोक्तीकडे झुकते. पुरुषाकडे गर्भाशय नाही, त्याच्याकडे स्तन नाहीत म्हणून त्याला दोषी धरणे किंवा त्याच्या अनुभवांना अपूर्ण ठरवणे हा स्त्रीवादाचा मूलार्थ नाही. उलट, हे निसर्गाच्या निर्मितीशी शिरजोरी करण्यासारखं वाटतं. कारण निसर्गाने स्त्री-पुरुष भिन्न घडवले आहेत, आणि ही भिन्नता पूरकतेसाठी आहे विरोधासाठी नव्हे.


स्त्रीकडे मातृत्व आहे, पुरुषाकडे त्यासाठी योगदान आहे; दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. म्हणून या अपूर्णतेला दोष मानणे चुकीचे ठरते. नदीने समुद्राला म्हणावं “तुझ्याकडे प्रवाह नाही म्हणून तू कमी” किंवा समुद्राने नदीला म्हणावं“तुझ्याकडे प्रवाह आहे पण विशालता नाही, म्हणून तू अपूर्ण”असा प्रकार या तुलनांमधून घडतो. निसर्ग अशी तुलना करत नाही; मग आपण का करावी?


याच संदर्भात स्त्रीवादाच्या नावाखाली अनेकदा एकांगी साहित्य किंवा विधानं समोर येतात. “पुरुषाला जर स्तन, गर्भाशय असते तर” अशी उदाहरणे उपरोधात्मक जरी वाटली तरी ती हास्यास्पदही ठरतात. कारण त्यातून कुठलाही सकारात्मक दृष्टिकोन मिळत नाहीत. उलट, जशास तसे उत्तर देण्याच्या भूमिकेत स्त्री लेखिका अडकतात. शिवाय, जर स्त्रीला शरीराच्या रचनेबाबत एवढा आक्षेप असता, तर आजच्या सोशल मीडियावर विशेषतः इंस्टाग्रामसारख्या मंचांवर स्वतःचे अंगप्रदर्शन करून लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवणाऱ्या स्त्रियांची संख्या इतकी मोठी झाली नसती. याच शारीरिक अवयवांचे प्रदर्शन मांडून अनेक प्लॅटफॉर्म वरून स्त्रीचे वस्तू म्हणून प्रकट होत राहणे किती अयोग्य आहे याबद्दल गुपचिळी पाळून सातत्याने पुरुषी नजरांना दोष देत लिहिणे, हे प्रचंड एकांगी व घातक आहे. यावरून हे स्पष्ट होते की शरीराविषयी असलेला वाद हा अनेकदा सैद्धांतिक राहतो, प्रत्यक्ष वर्तन मात्र वेगळ्याच दिशेला जातं.


खरा स्त्रीवाद म्हणजे पूरकतेची जाणीव ठेवून स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगणे. पुरुषाच्या शरीरावर आक्षेप घेऊन, त्याच्या अनुभवांचा उपहास करून स्त्रीवाद सिद्ध होत नाही. अशा भूमिकेत स्त्री आपलं सामर्थ्य गमावते आणि स्वतःला फक्त तुलना करण्यापुरती मर्यादित करून टाकतेय.


इतिहासाकडे पाहिलं तर स्त्रीवादी चळवळीचा उगम हा मुळात स्त्रीला समान हक्क मिळावेत, शिक्षण, रोजगार, राजकारण आणि वैयक्तिक जीवनात पुरुषाप्रमाणे स्थान मिळावं या हेतूनं झाला होता. समाजाच्या रचनेत स्त्रीला समान नागरिक म्हणून मान्यता मिळावी, ही त्या चळवळीची पायाभूत मागणी होती. त्यामुळे सुरुवातीचा स्त्रीवाद हा संघर्षात्मक असला, तरी त्यात एक सकारात्मकता होती “स्त्रीही माणूस आहे आणि तिच्या माणूसपणाला मान्यता द्या” अशी.


परंतु आज काही प्रवाहांमध्ये स्त्रीवादाचा सूर भरकटलेला दिसतो. पुरुषाशी स्पर्धा, त्याच्या शरीरावर आक्षेप, जशास तसे उत्तरं यामध्ये स्त्रीवादाचे मूळ उद्दिष्ट हरवते. या भरकटलेल्या प्रवाहामुळे स्त्रीवादाचा अंतःस्वर हरवून तो केवळ आक्रोश ठरतो. आणि अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे पुरुषवादालाही प्रतिसाद म्हणून तोंड फुटण्याची शक्यता आसपास वाढत आहे.


स्त्रीवादी चळवळीचा खरा आत्मा आजही हरवलेला नाही तो फक्त कोलाहलात दडलेला आहे. जर तो पुन्हा ऐकू आला, तर समाजाला समतेचा समतोल मार्ग नक्कीच सापडेल. पण त्यासाठी पुरुषांच्या सावलीत वाढलेल्या खोट्या स्त्रीवादाचे बुरखे फाडून फेकून द्यावे लागतील. 

लेखिका- ज्योती भारती 

       

थोडे नवीन जरा जुने