कोल्हापूर: जिल्ह्यातील नागरिकांना नशामुक्तीबाबत जागरुक करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत, शाही दसरा महोत्सव कालावधीमध्ये ‘रन अँड वॉक’ चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी एकाच वेळी नशामुक्त कोल्हापूरसाठी रन अँड वॉक मधून सहभागी होत हजारो नागरिक नशाविरोधी संदेश देणार आहेत.
कोल्हापूर शहरात दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता कसबा बावडा येथील पोलीस परेड ग्राऊंड येथे रनला सुरुवात होणार आहे. याबाबत कोल्हापूर शहरासाठी जिल्हा प्रशासनाकडून निःशुल्क नोंदणीसाठी लिंक तयार करण्यात आली असून
या लिंकवर कोल्हापूर शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांनी नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह जिल्हास्तरावरील संबंधित विभागाचे अधिकारी तसेच तालुकास्तरावरून व्हिसीद्वारे सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी जोडले गेले होते. एखाद्या जिल्ह्यात एकाच वेळी सर्व स्तरावर नशामुक्तीबाबत जनजागृती करण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम असणार आहे. ही बाब जिल्ह्यासाठी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी अभिमानास्पद असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले.
नशाबंदी, आरोग्य आणि फिटनेस यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना तसेच नागरिक सहभागी होवू शकतात. इच्छुकांनी तात्काळ नोंदणी करुन नशामुक्त कोल्हापूर अभियान यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात आयोजित रन अँड वॉकसाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जास्तीत जास्त सहभाग वाढेल यासाठी आवश्यक जनजागृती करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी यांनी कोल्हापूर शहरात राहणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शिक्षकांना तसेच एमआयडीसी मधील सर्व अधिकारी कामगार वर्गाला या रन अँड वॉक मध्ये सहभागी होण्यासाठी संबंधित विभागाने लेखी सूचना द्याव्यात असे सांगितले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस विभागासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांनाही यामध्ये नोंदणी करण्यासाठी आवाहन केले.
गाव, तालुका, नगरपंचायतस्तरावरही त्याच दिवशी रन अँड वॉकचे आयोजन
ज्याप्रमाणे मुख्यालय स्तरावर कोल्हापूर येथे नशा मुक्त कोल्हापूर साठी रन अँड वॉकचे आयोजन करण्यात आले आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये, तालुकास्तरावर तसेच सर्व नगरपरिषद स्तरावरसुद्धा रन अँड वॉक चे आयोजन करण्यात आले आहे. त्या त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्यासाठी तेथील स्थानिक नोंदणी लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या उपक्रमासाठी तहसील स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी प्रत्येक नगरपरिषदेने रन अँड वॉक साठी धावण्याचा मार्ग निश्चित करून त्यास प्रसिद्धी देण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच गट विकास अधिकारी यांनीही प्रत्येक गावात धावण्याचा मार्ग निश्चित करून त्यास प्रसिद्धी मिळेल यासाठी नियोजन करावे अशा सूचना केल्या. इतर नियोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेल यांनी तालुका स्तरावरती आयोजनाबाबत आवश्यक सूचना केल्या.
