BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

जेंव्हा हक्क पैशाच्या लाचारीत बदलतो तेंव्हा संघर्ष अटळ असतो...

कोल्हापूर - भूक ही माणसाच्या आयुष्यातली सर्वात मूलभूत गरज. पण जेव्हा भुकेवरच व्यापार उभा राहतो, तेव्हा तो व्यापार केवळ पोटावरच नाही तर सन्मानावरही घाला घालतो. जेवणाच्या नावाखाली उघड उघड घोटाळा चालतोय, घाणेरडं अन्न दिलं जातंय, आरोग्याशी खेळ केला जातोय आणि तरीही जबाबदार मंडळी गप्प आहेत. हे गप्प राहणं म्हणजे परवानगी देणं, पाठिशी उभं राहणं आणि मूळ गुन्ह्याला वैधता देणं.


संपूर्ण खेळ एका नालायक व्यक्तीच्या भोवती फिरतो. काम दिले की जबाबदारी संपली, हीच मानसिकता आहे. तो व्यक्ती आपला खिसा भरतो, दर्जा खालावत जातो, तक्रारी येतात, पुरावे समोर येतात, पण सगळं झाकलं जातं. कारण पाठीशी उभं राहणारा हात अधिक ताकदवान आहे. ज्यांच्या डोळ्यांतून या गलिच्छ कारभाराचं दर्शन घडायला हवं, तेच डोळे जाणीवपूर्वक मिटवले जातात.


हा प्रश्न अन्नाचा नाही, हा प्रश्न माणुसकीचा आहे. स्वच्छतेच्या, आरोग्याच्या, दर्जाच्या नावाने घेतलेले दर वसूल होतात, पण परत थाळीत येतं काय? किडे, घासण्याचे तुकडे, सडकी भाजी, पातळ भात. आणि या सगळ्यावर शिक्कामोर्तब करणारे तेच लोक, ज्यांनी कारवाई करायला हवी होती. थाळीतल्या भाकर्‍या जर सडलेल्या असतील, तर यंत्रणेची मानसिकता किती सडली असेल, याची कल्पना करायला फारसा विचार करावा लागत नाही.


ही फक्त पोटाची भूक भागवण्याची गोष्ट नाही, ही आर्थिक शोषणाची उघडपणे केलेली लूट आहे. पैशाचे बिल आगाऊ वसूल करा, गैरहजर राहिल्यास दंड ठोका, आणि बदल्यात देणं मात्र कचरा. हा कचरा थाळीतच नाही, तर थेट प्रशासनाच्या नितीमत्तेत भरला गेला आहे. जो कुणी आवाज उठवतो, त्याला शांत करण्याची सोय तयार ठेवली जाते. जो व्यक्ती नफा खातो, त्याचं संरक्षण केलं जातं..


प्रश्न विचारायला हवा कोणासाठी हा सगळा खेळ सुरू आहे? समाजाच्या भल्यासाठी की एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी? पोटभर जेवण हा हक्क आहे. पण इथे तो हक्क पैशाच्या लाचारीत बदलला आहे. आरोग्याच्या प्रश्नावर कारवाई न करणं म्हणजे गुन्हा लपवणं. आणि गुन्हा लपवणाऱ्याचा हात हा खऱ्या गुन्हेगारापेक्षा अधिक रक्तरंजित असतो.


या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक कटू सत्य नजरेआड करता येणार नाही खुर्चीवर बसून खोटी प्रतिष्ठा जपणं ही खरी चूक आहे. पदावर बसल्यामुळे सन्मान मिळतो, पण त्या सन्मानाला पायाभूत करण्याची जबाबदारी ही कामगिरीची असते. जर कामगिरी नाही, जबाबदारी नाही, तर तो सन्मान कागदीच ठरतो. खुर्ची टिकवण्यासाठी ठेकेदाराला पाठीशी घालणं, त्याच्या गैरव्यवहारावर पांघरूण घालणं. हे कुठलं नेतृत्व? हे तर स्वतःच्या खुर्चीचा आणि पदाचा अपमानच आहे.


इतिहास साक्षी आहे जिथे चूक आहे तिथे शिक्षा मिळतेच. आज नाही, उद्या नाही, पण जेव्हा सत्य उघडं पडतं, तेव्हा त्या खोट्या प्रतिष्ठेची राख होते. पोटावर घाला घालणाऱ्या पद्धतीने पद टिकवणं म्हणजे स्वतःच्या विनाशाला निमंत्रण देणं. कारण अन्याय कितीही लपवला तरी तो उघडकीस येतोच.यंत्रणा जेव्हा चुकीच्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते, तेव्हा सामान्य माणसाला फक्त दोन पर्याय राहतात गप्प राहून सडलेलं अन्न गिळून टाकावं, किंवा रस्त्यावर उतरून सडलेला कारभार थेट तोंडावर फेकून द्यावा. कारण भ्रष्टाचाराची भूक ही कधीच भागत नाही. जितकं खातो तितकं अजून हवं वाटतं.


आज हा प्रश्न एका थाळीपुरता दिसतोय. पण या थाळीतील अन्यायाचा विषारी वास लांबपर्यंत जाणार आहे. कारण जो पोट भरायला घाण देतो, तो मन भरायलाही घाणच देईल. जो भुकेवर तडजोड करायला लावतो, तो आयुष्याच्या इतर हक्कांवरही गदा आणेल.


ही लढाई भाकरीची नाही, ही लढाई सन्मानाची आहे. आणि जोपर्यंत चुकीच्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणाऱ्या हातांना झटका बसत नाही, तोपर्यंत थाळी स्वच्छ होणार नाही.

थोडे नवीन जरा जुने