कोल्हापूर | शहरातील महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराला आव्हान देण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) रस्त्यावर उतरली. दुचाकी आणि रिक्षांच्या 'घेराव मोर्चा'द्वारे मनपा प्रशासनाला इशारा देत आज ठाकरे गटाने महापालिकेच्या दारात आक्रोश केला. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनात्मक मोर्चा पार पडला.
मनपाच्या अधिकाऱ्यांमध्ये "भ्रष्टाचार स्पर्धा" लागली असून कोणी जास्त भ्रष्टाचार करतो, त्याला अधिक 'इनाम' मिळतंय, असा गंभीर आरोप इंगवले यांनी केला. "कोल्हापूर मनपात ८५ लाखांचा घोटाळा झालाय, आणि यामागे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं संगनमत आहे," असे ते म्हणाले.
"रस्ते धुळीत, घोटाळे टक्केवारीत!"
शहरात १०० कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प धुळ खात पडले आहेत, अशी टीका करत इंगवले म्हणाले, "फिर्यादीला आरोपी केलं जातंय आणि दोषींना मोकळं सोडलं जातंय." बावडा ड्रेनेज घोटाळ्याची उदाहरणं देत त्यांनी मनपा आयुक्तांवर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दबाव टाकला. "८५ लाखांचा घोटाळा जोक नाही, कोल्हापूरच्या जनतेच्या पैशांचा हा अपमान आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला.
"चौकशी झाली, अहवाल आला… पण कारवाई कुठे?"
बावडा ड्रेनेज घोटाळ्याप्रकरणी मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची चौकशीसाठी नियुक्ती केली होती. समितीने ४८ तासांत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला. मात्र, अहवाल आल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे, "प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का?" असा सवाल आता जनतेमध्ये उठू लागला आहे.
'टक्केवारीचे' आरोप: जनतेचा संयम सुटतोय
शहर अभियंता पदावरून सुरु असलेली 'मस्करी' आणि मनपात खुलेआम होत असलेल्या 'टक्केवारी व्यवहारां'मुळे शहरवासीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. "महापालिकेची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत, पण प्रशासकीय हालचाल शून्य आहे," असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
'जर कारवाई नाही, तर पुन्हा घेराव' – इंगवले यांचा इशारा
रविकिरण इंगवले यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. अन्यथा शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडेल."आजच्या आंदोलनात फलकांवर 'मनपा म्हणजे लुटारूंचं गडं', 'भ्रष्ट अधिकारी हटवा' असे घोषवाक्य झळकत होते. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणा आणि रस्त्यावर वाहनांचा ताफा यामुळे मनपाचा परिसर थरारला.
