Team Newsskatta
कोल्हापूर - कोल्हापुरातील नांदणी मठातल्या महादेवी हत्तीला गुजरातमधील वंतारा प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले, आणि त्याच क्षणी कोल्हापूरच्या मातीतील जनतेच्या काळजाचा ठोका चुकला. न्यायालयाच्या आदेशामुळे हत्तीण हलली खरी, पण तिच्या परतीसाठी जनतेने संघर्षाची मशाल पेटवली आहे.
"हे फक्त एक प्राणी नाही, आमच्या संस्कृतीचा, आमच्या श्रद्धेचा श्वास आहे," असे सांगत शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कोल्हापूरकरांनी तब्बल 40 किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा काढली. गावागावातून लोक रस्त्यावर उतरले. "आमच्या घरातील बाळ काढून नेल्यासारखं झालंय," अशा भावना प्रत्येकाच्या ओठांवर उमटल्या.
नांदणी मठातील महादेवी हत्तीला वंतरामध्ये नेण्याच्या निर्णयाने कोल्हापुरातील जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश उसळला आहे. फक्त न्यायालयाच्या आदेशामागे लपून ही कारवाई झाली नसून, या मागे भांडवलशाही शक्तींचा दबाव असल्याचा आरोप आता थेट जनतेकडून होत आहे.
"अंबानी फक्त पैसे देतो, पण मत घेण्यासाठी यालाच आमच्या दारात यावं लागतं," असा रोषजनक इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. यावेळी बोलताना ते म्हणाले आमदार सतेज पाटील यांनी अडीच लाख सह्या गोळा करून राष्ट्रपतींना पाठवल्या आहेत. "आज महादेवीला नेलं, उद्या आपले सगळे प्राणी घेऊन जातील, पंढरपूरच्या रिंगणातील घोडाही सुरक्षित राहणार नाही," अशी तीव्र भावना आंदोलक व्यक्त करत आहेत.
कायदा तोडून कारवाई, राष्ट्रपतींकडे निर्णयाची मागणी
"न्यायालयाच्या आदेशाचे सोंग आणून, कायद्यातील पळवाटांचा वापर करून आमच्या श्रद्धास्थानांवर गदा आणली जात आहे," असा आरोप आंदोलकांनी केला आहे. "राष्ट्रपतींनी यावर तातडीने निर्णय द्यावा, अन्यथा जनतेच्या उद्रेकाला थोपवणं कोणाच्याही हातात राहणार नाही," असा इशाराही देण्यात आला.
Jio कार्ड बंदीने सुरुवात, पुढचे टप्पे ठरलेले!
या आंदोलनाने आता भांडवलशाही विरुद्धचा संघर्षाचा रंग घेतला आहे. "फक्त दीड लाख लोकांनी Jio कार्ड बंद केले आहे. येत्या 8 दिवसांत हा आकडा 5 लाखांवर जाईल," असा दावा आंदोलकांनी केला. Reliance मॉल, पेट्रोल पंप, शेअर बाजार यावर पुढची टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येईल, असा निर्धार जनतेतून व्यक्त होत आहे."अंबानीने आता सहन करायला शिकावं," असा थेट इशारा देत कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उतरून आर्थिक विरोधाची मशाल पेटवली आहे.
राजकीय नेत्यांवर संतापाचा झणझणीत फटका
या आंदोलनात लोकांनी स्थानिक खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना थेट धारेवर धरले. "फक्त निवडणुकीला मतं मागायला येता, आमच्या श्रद्धास्थानावर गदा आली की तुम्ही मूग गिळून गप्प?" असे जाब विचारले गेले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे महादेवीला परत आणण्यासाठी निवेदन देण्यात आले असून, हे निवेदन थेट राष्ट्रपतींना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जनतेला राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार आहे," असे स्पष्ट करत राजू शेट्टी यांनी लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या विषयावर तातडीची बैठक बोलावली असून, कायदेशीर पर्याय तपासले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. परंतु, "महादेवी परत आलीच पाहिजे," हा जनतेचा निर्धार आहे.
