Team Newsskatta
मैत्री म्हणजे निस्वार्थ नातं", असं आपण अनेकदा वाचतो, ऐकतो. पण आजच्या काळात या वाक्याला खरोखरच किती अर्थ आहे? मैत्री म्हणजे केवळ मैत्री ठेवणं की तिचा उपयोग करून घेणं? हा प्रश्न आता वारंवार मनात डोकावतोय.
आजची मैत्री ही नाण्याच्या दोन बाजूसारखी झाली आहे – एक बाजू अजूनही नितळ, प्रेमळ आणि समर्पित आहे, तर दुसरी बाजू मात्र व्यवहारिक, स्वार्थी आणि वापरून फेकणारी वाटते. आपण कितीही नकार देण्याचा प्रयत्न केला, तरीही वास्तवापासून दूर जाऊ शकत नाही.
पूर्वी कृष्ण-सुदामासारखी मैत्री आदर्श मानली जायची – जिथे प्रेम, आदर, आणि एकमेकांसाठी निस्वार्थ भाव असायचा. पण आज अशी मैत्री दुर्मीळ झाली आहे. अनेकदा मैत्रीच्या नावाखाली फसवणूक, भावनिक शोषण आणि अगदी अत्याचारसुद्धा घडताना दिसतो. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवून अनेक मुली चुकीच्या विश्वासात अडकतात आणि त्यांचं भावनिक, कधी कधी शारीरिक शोषणही केलं जातं.
आज "मैत्री" या शब्दाचा वापर एखादी संधी, वेळ येताच उपयोग करून घेण्याचं साधन म्हणून केला जातो. "जोवर उपयोग आहे, तोवर तुझं अस्तित्व आहे" – ही भावना हल्लीच्या अनेक संबंधांमध्ये दिसते.
मात्र, याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच स्वार्थी नाती आहेत. अजूनही काही नाती आहेत, जी खऱ्या अर्थाने आपली जात ओळखतात. संकटात खंबीर उभं राहतात. तुमच्या अश्रूंना शब्दांशिवाय समजून घेतात. अशा मैत्रीची किंमत पैशात नाही, नात्याच्या खोलीत असते.
आजचा युवक-युवतींचा विचार पाहिला तर अनेकांना फॉलोअर्स, स्टेटस, शो ऑफ आणि ब्रँडेड गिफ्ट्सच्या नावाखाली मैत्री करायची आहे, भावना नाही – यामध्ये स्थैर्य नाही, समर्पण नाही. आणि म्हणूनच अशी मैत्री जास्त काळ टिकत नाही.
म्हणून आजच्या पिढीसमोर एक जबाबदारी आहे – मैत्री निवडताना हुशारीने विचार करणं. फक्त बोलण्यातली गोडी पाहून नाही, तर कृतीतून माणूस ओळखणं गरजेचं आहे. मैत्रीची व्याख्या पुन्हा एकदा मनात कोरून ठेवायला हवी – प्रेम, विश्वास आणि निष्ठा.
शेवटी एकच विचार :
मैत्री करणं सोपं आहे, पण मैत्री निभावणं हीच खरी परीक्षा आहे.
विशेष लेख कोमल वखरे
.jpeg)