कोमल वखरे/ छत्रपती संभाजीनगर – शहरातील सिडको एन-६ भागातील अविष्कार कॉलनीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आठ दिवसातून केवळ एकदाच नळाला पाणी येत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत असून, त्यासाठी अतिरिक्त खर्चही करावा लागत आहे.
रहिवाशांनी अनेक वेळा महापालिकेकडे तक्रारी केल्या असूनदेखील कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. जेव्हा पाणी येतं, तेही केवळ एका तासासाठीच. त्यामुळे अनेक घरांमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा करणेही अवघड होऊन बसले आहे. नागरिकांना खासगी टँकर मागवावा लागतो आणि त्यामुळे दरमहा अतिरिक्त आर्थिक भार वाढत आहे.
"आमचं काही ऐकून घेतलं जात नाही. निदान दर चार दिवसांनी तरी पाणी मिळावं, हीच आमची मागणी आहे," असं अविष्कार कॉलनीतील एका रहिवाशाने सांगितलं. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
.jpeg)