"काय बोलणार? संसार आहे, थोडंसं सहन करावंच लागतं!"
"बाहेर काय काय होतंय, तू तरी किती सुरक्षित आहेस!"
"आई-बाबांना सांगू नकोस… लोक काय म्हणतील!"
हे वाक्य कुणा एका स्त्रीच्या नव्हे, तर लाखो भारतीय महिलांच्या जगण्याचं वास्तव आहे. आज मी डिजिटल रिपोर्टर असते, तर माझी पहिली स्टोरी याच वास्तवाच्या वेदनेवर असती.आजही हजारो महिला विवाहित किंवा अविवाहित मानसिक, शारीरिक, सामाजिक छळ सहन करत आहेत.आणि दुर्दैव म्हणजे…या छळाचा गुन्हा दाखल होतो तेव्हाच समाज जागा होतो, पण जेव्हा ती महिला दिवसन्दिवस घरात, चार भिंतींमध्ये, कधी नकारांनी तर कधी मारांनी तोलून पाहत असते… तेव्हा कोणालाही तिच्या 'मौन' ची किंमत समजत नाही.
छळ म्हणजे फक्त मार, शिवी किंवा हात उचलणं नसतं —
कधी त्याच्या ‘डोळ्यांतल्या’ तिरस्कारात,
कधी तिच्या ‘अस्तित्वाला’ नाकारण्यात,
तर कधी ‘ती मूळची घरची नाही’ म्हणून सतत वागणुकीतून होणाऱ्या उपेक्षेत तो असतो.या स्त्रिया रोज लढतात, रोज गिळतात… आणि ‘सहन’ या शब्दात आपली संपूर्ण ओळख हरवून बसतात.आजही अनेक महिला "मी हे सहन करत आहे" हे सांगायला घाबरतात.समाज काय म्हणेल? आई-वडिलांच्या इज्जतीचं काय?मुलांचं काय होईल?या प्रश्नांनी ती स्वतःच्या आयुष्याचा गळा घोटते.म्हणूनच, जर मी डिजिटल रिपोर्टर असते,तर मी तिच्या आवाजासाठी माझा आवाज वापरला असता.
एक डिजिटल स्टोरी एक लढा:माझी पहिली स्टोरी असती
"ती बोलत नाही... म्हणून वेदना नसतात असं नाही!"
एक अशी सिरीज जिथे प्रत्येक महिलेला, गुप्तपणे का होईना, आपली कहाणी सांगता येईल.जिथे छळाच्या नोंदी फक्त न्यायासाठी नव्हे, तर इतर महिलांसाठी शिकवणी ठरतील.कारण हे फक्त बातमी नाही एक जबाबदारी आहे: या स्टोरीतून मी महिलांना केवळ सहानुभूती नाही, तर स्वाभिमान देण्याचा प्रयत्न केला असता.त्यांच्या अस्तित्वाला, त्यांच्या आवाजाला, त्यांच्या 'गप्प' झालेल्या स्वप्नांना शब्द दिले असते.
"तू फक्त बायको नाहीस
तू एक मुलगी आहेस,
तू एक स्वप्न आहेस,
तू एक जग आहेस!"
डिजिटल रिपोर्टिंग फक्त ट्रेंडिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूजसाठी नको तर अशा 'न ब्रेक होणाऱ्या' आवाजांसाठी हवं आहे.मी रिपोर्टर असते,तर माझा पहिला स्टोरी 'सहन करणाऱ्या पण मोडून न पडलेल्या' एका स्त्रीच्या आवाजासाठी असती.
विशेष लेख कोमल वखरे
.jpeg)