Team Newsskatta
आपल्या आजूबाजूला बघितलं, की कुठे चित्रं काढणारा एखादा विद्यार्थी, कुठे गाणं गाणारी एक लहान मुलगी, कुठे नाटकात जीव ओतणारा अभिनेता, तर कुठे कविता लिहणारा एक तरुण दिसतो. हाच कलाकार. कलाकार म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या मनातल्या भावना, विचार, अनुभव हे सगळं कलेच्या माध्यमातून व्यक्त करतोकलाकाराचं काम फक्त लोकांचं मनोरंजन करणं नाही, तर त्यांना विचार करायला लावणं हे सुद्धा आहे. कलाकार लोकांना हसवतो, रडवतो, पण त्याचबरोबर विचारही देतो. तो आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, समस्या, भावना यांचं चित्रण करतो. म्हणूनच कलाकार हा समाजाचा आरसा मानला जातो .
कलाकार म्हणजे असा माणूस, ज्याचं मन खूपच संवेदनशील असतं. तो लहानशा गोष्टीतसुद्धा काहीतरी वेगळं, सुंदर पाहू शकतो. एखादी आई आपल्या बाळाला प्रेमाने दूध पाजते, ही गोष्ट बघून एक चित्रकार त्यावर सुंदर चित्र काढतो. एखादा कवी त्यावर कविता लिहितो. गायक त्या क्षणांमधलं ममता आणि प्रेम आपल्या गाण्यातून दाखवतो. म्हणजेच, कलाकार ही भावना लोकांपर्यंत पोहोचवतो.कला ही कलाकारासाठी केवळ करियर नाही, ती त्याचं आयुष्य असतं. एक चित्रकार दिवसरात्र मेहनत करून चित्र पूर्ण करतो. एक नट अनेक वेळा सराव करून भूमिका साकारतो. गायक सातत्यानं रियाज करतो. एक लेखक आपल्या विचारांत हरवून लेखन करतो. या सगळ्यामागे फक्त नाव मिळवायचं असं नसतं, तर स्वतःची ओळख निर्माण करायची असते.कलाकाराला भावनांचा स्पर्श लवकर होतो. एखादी गरीब माणसाची परिस्थिती पाहून तो अस्वस्थ होतो आणि ते त्याच्या कलेतून व्यक्त करतो. समाजात काही चुकीचं घडतंय, हे पाहून तो ते रंगात, शब्दात, गाण्यात किंवा भूमिकेतून लोकांपर्यंत पोहोचवतो.आज समाज वेगाने बदलतोय. लोकं धावपळीत आहेत, नातेसंबंध सुटत आहेत, आणि माणसं एकटी पडत आहेत. अशा वेळी कलाकार आपल्या कलेतून लोकांच्या मनात शांतता, प्रेरणा आणि आशा निर्माण करतो. एखादी शॉर्ट फिल्म बघून मन हलतं, एखादी कविता वाचून डोळे पाणावतात, एक नाटक पाहून आपण विचार करतो – हीच कला.
कलाकार समाजात घडणाऱ्या गोष्टींवर आपलं मत व्यक्त करतो. उदाहरणार्थ, महिलांवरील अन्याय, शिक्षणाची कमतरता, बेरोजगारी, मानसिक आरोग्य – या विषयांवर कलाकारांनी वेळोवेळी चित्रपट, गाणी, लेख, नाटकं सादर केली आहेत. यामुळे लोकांच्या मनात जागरूकता निर्माण होते.कलाकाराकडे एक मोठी ताकद असते – लोकांच्या मनावर परिणाम करण्याची. म्हणूनच, कलाकारानं नेहमी जबाबदारीने वागायला हवं. जे योग्य आहे, तेच लोकांपर्यंत पोहचवायला हवं. अनेक वेळा प्रसिद्धीसाठी काही कलाकार चुकीचं कंटेंट तयार करतात, अशा गोष्टी समाजाला चुकतं मार्गदर्शन करतात. म्हणून एक चांगला कलाकार हा फक्त कलाकार नसतो, तर तो एक शिक्षक, मार्गदर्शक आणि विचारवंत सुद्धा असतो.
पूर्वी कलाकारांची कला फक्त रंगमंचावर, चित्रपटात किंवा रेडिओवर ऐकायला मिळायची. पण आता डिजिटल युग आहे. आज सोशल मीडियामुळे कलाकारांना आपली कला लाखो लोकांपर्यंत पोहोचवता येते. इंस्टाग्राम Reels, यूट्यूब शॉर्ट्स, पॉडकास्ट, ब्लॉग्स, ऑनलाइन थिएटर, हे सगळं कलाकारांसाठी नवं व्यासपीठ झालं आहे.आज कोणताही तरुण जर खरं मनापासून काही सांगू इच्छितो, काहीतरी वेगळं दाखवू इच्छितो, तर त्याच्यासमोर खूप संधी आहेत. गरज आहे फक्त मेहनत, सच्चाई आणि सातत्याची.
प्रत्येक कलाकाराला संघर्ष करावा लागतो. सुरुवातीला लोक ओळखत नाहीत, म्हणतात "हौस आहे, टिकणार नाही", पण जर मनापासून प्रयत्न केले, तरच तो पुढे जातो. अनेक कलाकार सुरुवातीला नाकारले गेले, पण नंतर त्यांनीच इतिहास घडवला. त्यामागचं कारण होतं – आत्मविश्वास आणि आपल्यावर असलेली श्रद्धा. कलाकार हा काळाच्या आरशात समाजाचं खऱ्या अर्थानं दर्शन घडवतो.
विशेष लेख स्नेहल तोडकर
