कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताच राज्य सरकारने कोल्हापूरपुरती अधिसूचना मागे घेतली होती. मात्र, नव्या आराखड्यानुसार आता हा महामार्ग पुन्हा कोल्हापूरमधून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर केला आहे.
अध्यक्षीय शासकीय आदेशात कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाचा समावेश पुन्हा नमूद करण्यात आला आहे. मार्चमध्ये काढलेली अधिसूचना ऑक्टोबरमध्ये रद्द करण्यात आली होती, परंतु अध्यक्षीय आदेशाच्या माध्यमातून आता महामार्ग होणार हे स्पष्ट झाले आहे.
सतेज पाटील म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीवर खंजीर खुपसला आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या महामार्गाची गरज नाही. त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न म्हणजे शेतमालाला हमीभाव, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, तरुणांना रोजगार आणि मुंबईतील लोकल ट्रेनमधील अपघात थांबवणे हे आहेत. जर खर्च करायचाच असेल तर नागपूर–रत्नागिरी महामार्ग, मुंबई लोकलसाठी उपाययोजना किंवा सरकारी नोकरभरती यावर पैसे खर्च करा, परंतु शक्तीपीठ महामार्गाची सक्ती करू नका."
कोल्हापूरकरांची दिशाभूल करून सरकारने पुन्हा अधिसूचना बदलली असल्याचा ठपका ठेवत त्यांनी पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.
