जयसिंगपूर | शिरोळ तालुक्यातील चिपरी येथे बुधवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संदेचा लक्ष्मण शेकके (वय २२) या युवकाचा अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण खून केला. बहिणीसोबत घराकडे परतत असताना तेल कंपनीच्या गेटसमोर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मिळालेल्या माहितीनुसार, संदेचा सकाळी आपल्या बहिणीसोबत चिपरी फाट्यावरून घरी परतत होता. याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत गेटसमोर थांबवून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. संदेचा जीव वाचवण्यासाठी धावत असताना हल्लेखोरांनी त्याला गाठून जागीच ठार मारले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. खून वैयक्तिक वैरातून झाला की इतर कोणत्या कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्लेखोरांचे उद्दिष्ट काय होते आणि त्यामागील मास्टरमाइंड कोण, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून, पोलीस पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. हल्लेखोरांचा तपास लवकरात लवकर लागावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
---
