गोकुळ दूध संघात वसुबारसनिमित्त गाय-वासरू व म्हशीचे पूजन
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने वसुबारसनिमित्त ताराबाई पार्क येथील संघाच्या कार्यालयाच्या प्रांगणात गाय-वासरू व म्हशीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य सागर बलकवडे यांनी सपत्नीक धार्मिक विधीपूर्वक पूजन केले.
यावेळी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे म्हणाले की, भारतीय संस्कृतीत वसुबारस सणाला विशेष महत्त्व असून पशुधनाप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा आहे. गोकुळच्या वतीने दरवर्षी हा सण साजरा केला जातो. दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वाचा आधार असून जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी गोकुळ सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यांनी यावेळी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
प्राधिकृत अधिकारी मंडळाचे सदस्य डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी देशी गोवंशाच्या जातींचे जतन व संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. खिल्लारसारख्या देशी गायींच्या जातींचे संरक्षण करण्याबरोबरच दूध उत्पादकांनी पशुधनाचे आरोग्य, योग्य आहार आणि संगोपनाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक पशुसंवर्धनाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्याला अनुकूल भौगोलिक परिस्थिती आणि पाणी व चाऱ्याची उपलब्धता लाभली असली, तरी भविष्यातील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन दूध उत्पादकांनी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर करण्यासाठी शासन, गोकुळ दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असून दूध उत्पादकांच्या अडचणी सोडविण्यासाठी गोकुळ कायम त्यांच्या पाठीशी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे, डॉ. चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, हणमंत पाटील, डॉ. दयावर्धन कामत, डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. दळवी, धनाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी आणि महिला स्वयंसेविका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. पी. पाटील यांनी केले.
