कोल्हापूर | सहकार

‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट

दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा!

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची महत्त्वपूर्ण घोषणा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. दूध उत्पादकांनी प्राथमिक दूध संस्थांमार्फत पुरवठा केलेल्या दुधाचा अंतिम दर फरक सणासुदीच्या काळात देण्याची गोकुळची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत संघाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील म्हैस व गाय दुधाच्या अंतिम दूध दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपयांची रक्कम दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे. दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संघ कटिबद्ध असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दिली.

दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा!

आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या अंतिम दूध दर फरकापोटी गोकुळकडून एकूण ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा.

म्हैस आणि गाय दुधासाठी अंतिम दर फरक

आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये दि. ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे (३.८१%) व गाय दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे (३.५१%) याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे. दूध संस्थांसाठी प्रतिलिटर सरासरी २० पैसे याप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स खाती जमा करण्यात आले आहेत.

₹ २.२५

म्हैस दूध दर फरक
प्रतिलिटर

₹ १.२५

गाय दूध दर फरक
प्रतिलिटर

₹ ०.२०

दूध संस्थांसाठी डिबेंचर्स खात्यात प्रतिलिटर सरासरी जमा

दर फरकाची संपूर्ण आर्थिक आकडेवारी

गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ६३ कोटी १२ लाख ११ हजार रुपये, तर गाय दुधाकरिता ३९ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये व डिबेंचर व्याज ६.५० टक्के प्रमाणे ११ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये, असे एकूण ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली आहे.

₹ ६३.१२ कोटी

म्हैस दूध दर फरक

₹ ३९.१३ कोटी

गाय दूध दर फरक

₹ ३.४२ कोटी

दर फरकावरील ६% व्याज

₹ ११.७३ कोटी

डिबेंचरवरील ६.५०% व्याज

₹ ११७.४२ कोटी

एकूण जमा करण्यात आलेली रक्कम

तसेच लाभांश (डिव्हीडंड) ११ टक्के प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अदा केला जाईल. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून दिवाळीची गोड भेट आहे, अशी भावना संघाचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी व्यक्त केली.

८ हजार दूध संस्थांच्या ५ लाख उत्पादकांना लाभ

या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील गोकुळ संलग्न ८ हजार दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या अंतिम दूध दर फरकाव्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास, मायक्रोट्रेनिंग, दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान, मिल्को टेस्टर खरेदी, संगणक खरेदी, शैक्षणिक सहल, दूध उत्पादकांना किसान विमा पॉलिसी, भविष्य कल्याण निधी, जातिवंत म्हैस खरेदी अनुदान व वासरू संगोपनावर अनुदान व सेवा-सुविधा दिल्या आहेत.

८,०००

संलग्न दूध संस्था

५ लाख

दूध उत्पादक सभासद

याबरोबर गोकुळ संलग्न दूध उत्पादकांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी व दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे उच्च गुणवत्तेचे महालक्ष्मी पशुखाद्य कोहिनूर डायमंड, मिनरल मिक्स्चर (फर्टीमिन प्लस), टी.एम.आर.चा पुरवठा, अनुदानावर काफ स्टार्टर, मिल्क रिप्लेसर उत्पादकांच्या दारापर्यंत पोहोच करीत आहे.

दूध संकलनाचा २० लाख लिटरचा टप्पा पार

गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा २० लाख लिटरचा टप्पा ओलांडला असून, दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात सणानिमित्त २५ लाख ४५ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ६१ रुपये ९८ पैसे, तर गाय दूध उत्पादकास ३७ रुपये ५३ पैसे इतका उच्चांकी सरासरी दूध दर अंतिम दर फरकासह मिळाला आहे.

२० लाख लिटर

प्रतिदिन दूध संकलनाचा टप्पा

२५.४५ लाख

एका दिवसातील विक्रमी दूध विक्री (लिटर)

₹ ६१.९८

म्हैस दूध उत्पादकांना सरासरी दर (प्रतिलिटर)

₹ ३७.५३

गाय दूध उत्पादकांना सरासरी दर (प्रतिलिटर)

गोकुळची वार्षिक उलाढाल ४,१८५ कोटी रुपये

गोकुळची सन २०२५-२६ मध्ये ४,१८५ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली असून, यामध्ये दूध उत्पादक, प्राथमिक दूध संस्था, वितरक, ग्राहक तसेच संघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. यापुढील काळातही गोकुळची प्रगतीची वाटचाल अधिक सक्षमपणे सुरू राहील. गोकुळच्या दूध संकलनाचा २५ लाखांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी तसेच म्हैस दूध संकलन वाढीसाठी भविष्यात दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले.

वार्षिक उलाढाल

₹ ४,१८५ कोटी

आर्थिक वर्ष २०२५-२६

दूध उत्पादकांना दर फरकाची रक्कम अदा करण्याचे आवाहन

गोकुळच्या संलग्न दूध संस्थांनी दीपावलीपूर्वी फरकाची रक्कम दूध उत्पादक सभासदांना अदा करून त्यांच्या दीपावलीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी केले. दूध उत्पादक सभासदांच्या आनंदात भर घालण्यासाठी सर्व संचालक मंडळ तसेच प्राधिकृत अधिकारी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व सर्व हितचिंतकांना दीपावलीनिमित्त गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा दिल्या.