माधवी भाभींचा लोणचे-पापड व्यवसाय बंद; परवाना निलंबित!
मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या गोकुळधाम सोसायटीवर पुन्हा एकदा मोठे संकट आले असून, यावेळी या संकटाच्या केंद्रस्थानी माधवी भिडे आहेत. क्रिएटर आणि प्रोड्युसर असित कुमार मोदी यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील सध्याच्या कथानकात तणाव, रंजक वळणे आणि विनोदासोबतच स्वच्छता, हायजीन आणि अन्नसुरक्षेबाबत महत्त्वाचा संदेशही देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या तसेच समकालीन विषयांना आपल्या कथानकातून प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी ओळखला जातो. समाजात आणि दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटना तसेच चर्चांमधून प्रेरणा घेत, मनोरंजनासोबतच अर्थपूर्ण संदेश देण्याची मालिकेची खास शैली राहिली आहे. याच धर्तीवर सध्याच्या कथानकातून अन्नपदार्थांची स्वच्छता आणि सुरक्षितता हा विषय अधोरेखित करण्यात आला आहे.
लोणच्यात आढळला काचेचा तुकडा; एफडीएची कारवाई
माधवी भिडे यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला लोकप्रिय घरगुती लोणचे-पापड व्यवसाय अचानक अडचणीत सापडतो. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला आणि जपलेला हा व्यवसाय त्यांच्यासाठी केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्यांच्या स्वतःच्या ओळखीचा आणि अभिमानाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, त्यांच्या लोणच्याच्या एका उत्पादनामध्ये कथितरित्या काचेचा तुकडा आढळल्याने अन्न व औषध विभागाकडून त्यांच्या व्यवसायाचा परवाना निलंबित करण्यात येतो.
अनवधानाने झालेली चूक की कटकारस्थान?
मात्र, या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. लोणच्यामध्ये काचेचा तुकडा आला तरी नेमका कसा? ही घटना अनवधानाने झालेली चूक आहे का, की यामागे आणखी एखादे अनपेक्षित वळण दडले आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता माधवींसमोर उभे ठाकले आहे.
माधवींची प्रतिष्ठा आणि त्यांचा व्यवसाय दोन्ही पणाला लागले असताना संपूर्ण गोकुळधाम परिवार त्यांच्या पाठीशी उभा राहतो. नेमके काय घडले, लोणच्यामध्ये काचेचा तुकडा कसा आला आणि या प्रकरणामागचे सत्य काय आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न गोकुळधाममधील सदस्यांकडून केला जातो.
अन्न सुरक्षितता आणि हायजीनचा महत्त्वाचा संदेश
या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मालिकेच्या कथानकातून अन्नपदार्थांच्या बाबतीत स्वच्छता, हायजीन आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही, हा साधा मात्र अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. अन्न व्यवसाय करणाऱ्यांनी कठोर सुरक्षा मानकांचे पालन करण्याची जबाबदारी तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नियामक यंत्रणांची असलेली महत्त्वाची भूमिका या दोन्ही बाबी या कथानकातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
माधवींसाठी मात्र खरी लढाई आता सुरू झाली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांना या संपूर्ण प्रकरणाचा सामना करावा लागणार आहे. लोणच्यामध्ये काचेचा तुकडा नेमका कुठून आला, याचे गूढही उकलावे लागणार आहे.
उत्सुकता वाढली! पुढे काय घडणार?
दरम्यान, माधवी भाभी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकतील का, लोणच्यात काचेचा तुकडा नेमका कसा आला आणि त्यांचा प्रसिद्ध लोणचे-पापड व्यवसाय पुन्हा सुरू होणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रवासात ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या प्रेक्षकांना पुढील भागांमध्ये भरपूर नाट्य, हास्य आणि अनेक अनपेक्षित वळणे पाहायला मिळणार आहेत.

