कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर
‘गोकुळ’कडून दूध खरेदी व विक्री दरात सुधारणा
‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात १ रुपया वाढ
कोल्हापूर, ता. ०८ ऑगस्ट २०२६
६.० फॅट व ९.० एस.एन.एफ.
सुधारित दर: ₹५५.०० (पूर्वी ₹५३.५०)
लागू तारीख: ११ ऑगस्ट २०२६ पासून३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ.
सुधारित दर: ₹३७.०० (पूर्वी ₹३६.००)
लागू तारीख: ११ ऑगस्ट २०२६ पासूनकोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) शी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून श्रावण महिन्याच्या प्रारंभी दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे. दि. ११ ऑगस्ट २०२६ पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया ५० पैसे, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपया वाढ करण्यात आली आहे.
यानुसार ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५३.५० रुपयावरून ५५ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३६ रुपयावरून ३७ रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त दर मिळणार आहे.
गोकुळशी संलग्न सुमारे ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सध्या प्रतिदिन सरासरी १४ ते १५ लाख लिटर दूध संकलित केले जाते. दूध उत्पादक हे गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या दुग्ध व्यवसायाला स्थैर्य मिळावे आणि उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.
"सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरातील वाढ आणि एकूणच महागाईचा सर्वंकष विचार करून दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत प्रशासकीय मंडळाने ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसायाच्या वाढीसाठी संघ सदैव तत्पर आहे."
दि. ०८ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या संघाच्या प्रशासकीय मंडळ व अधिकारी यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. सुधारित दूध खरेदी दराबाबतचे दरपत्रक लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे.

