डॉ. संजय डी. पाटील यांना राज्याचा सर्वोच्च ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न’ पुरस्कार
मुंबई | प्रतिनिधी : कृषी क्षेत्रातील बहुमोल, प्रयोगशील आणि दीर्घकालीन योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये कृषी दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते हा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. पाटील यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. वैजयंती संजय पाटील उपस्थित होत्या.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांनी महाराष्ट्रातील आधुनिक, समृद्ध आणि शाश्वत शेतीबाबत विश्वास व्यक्त करत, “समृद्ध, शाश्वत आणि आधुनिक शेतीच्या बळावर महाराष्ट्र भविष्यात वैश्विक स्तरावर देशाचे नेतृत्व करेल,” असे प्रतिपादन केले.
कृषी विभागामार्फत २०२३ व २०२४ या वर्षांतील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण बुधवारी कृषी दिनानिमित्त करण्यात आले. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी संचालक रफिक नायकवडी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी २०२३ चा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न’ पुरस्कार डॉ. संजय डी. पाटील यांना, तर २०२४ चा पुरस्कार यज्ञेश सावे यांना प्रदान करण्यात आला. राज्यभरातील विविध क्षेत्रांतील एकूण १८ ९ कृषी पुरस्कारांचे वितरण या सोहळ्यात दिमाखात करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण सर्वजण महान कृषी संस्कृतीचे वाहक आणि प्रेरणास्थान आहात. आपल्या कार्यामुळे पुरस्काराचाही सन्मान अधिक उंचावला आहे.”
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकरी शाश्वत शेतीकडे वळतील, याची खात्री आहे.”
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी इतरांना मार्गदर्शन करून त्यांच्या प्रगतीसाठी कार्य करावे, असे आवाहन केले. कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.
डॉ. संजय डी. पाटील यांनी आधुनिक व प्रयोगशील शेती, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि ‘सनशाईन’ या शेतकरी ब्रँडच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभारले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि मूल्यवर्धनाचा प्रभावी वापर करून त्यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे. त्यांचे कार्य राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गौरवोद्गार काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, डॉ. पाटील यांनी कृषी, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय आणि आधुनिक शेतीच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना नवे बळ दिले आहे. शेतीत आधुनिकता आणण्याचे मोठे कार्य त्यांनी केले असून शेतकरी विकासासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. तसेच तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य उभारल्याचा गौरव मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
“हा सन्मान माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, सहकारी, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. भविष्यातही शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न कायम राहतील.”
समारंभास उपस्थित पाटील कुटुंबीय व मान्यवर:
सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, सौ. सुप्रिया चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, सौ. राजश्री काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सौ. स्नेहलता तेजस पाटील, देवश्री पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. मनीष भल्ला, सीएचआरओ श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. महादेव नरके, डी. एन. शेलार, अमोल गाताडे, पी. डी. उके, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप व सहकारी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकरी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
