शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ६० वा वर्धापन दिन कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात भगवामय वातावरण निर्माण झाले होते.
वर्धापन दिनानिमित्त सकाळी साडेनऊ वाजता श्री अंबाबाई मंदिरात महाआरती करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, तसेच राज्यात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
त्यानंतर मिरजकर तिकटी येथे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित शिवसैनिकांनी राष्ट्रगीत सादर करत वर्धापन दिनाचा उत्साह साजरा केला. तसेच नागरिकांना साखर-पेढ्यांचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि शहरप्रमुख मंजित माने यांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत पक्षाच्या विचारांशी निष्ठा राखत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी केले.
