अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी १५०० कोटींचा कॉरिडॉर; अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ
कोल्हापूर | दि. २०
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या प्रकल्पामुळे दक्षिण भारताची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.
मान्यवरांची उपस्थिती
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार धनंजय महाडिक, धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, निरंजन डावखरे, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, महापौर रुपाराणी निकम, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमित शहा काय म्हणाले?
यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, सातव्या शतकातील या प्राचीन मंदिराचा परिसर जतन करत विकास साधला जाणार असून परिसरातील ४१ लहान-मोठ्या मंदिरांचे संरक्षण करण्यात येईल. पुढील सहा महिन्यांत या विकासकामांना गती देण्यात येणार असून भाविकांसाठी अन्नछत्र सुरू करण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येत आहे. देशाच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या विकासाचा आढावा घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक, संरक्षण आणि सुरक्षाविषयक क्षेत्रांत मोठी प्रगती झाल्याचे सांगितले. देशात घुसखोरी करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांचे मत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख नव्याने बळकट होत आहे. राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांसह जोतिबा देवस्थानाच्या विकासाची कामे सुरू असून अंबाबाई मंदिर विकास आराखड्यामुळे पुढील शंभर वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन भाविकांना सुविधा उपलब्ध करून देता येतील. कोल्हापूर हे केवळ शक्तिपीठ नसून सहकाराची आद्य पंढरी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिर परिसराच्या आधुनिकीकरण आणि सुशोभीकरणाच्या कामामुळे कोल्हापूरची ओळख अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्राने देशाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगळी दिशा दिली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशातून नक्षलवाद निर्मूलनासाठी प्रभावी पावले उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांचे मत
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा हा कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत, या प्रकल्पातून भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण होणार असल्याचे नमूद केले. राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनाने अधिकाधिक सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचा समारोप
कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महालक्ष्मीची मूर्ती आणि तलवार देऊन सत्कार करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले, तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती. संपूर्ण परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
