गोकुळ दूध संघ निवडणूक: सतेज पाटील यांच्याकडून 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' पॅनेलची घोषणा
गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेची घोषणा होताच जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आज एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून आपल्या पॅनेलच्या नावाची घोषणा केली आहे. 'राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी' असे या पॅनेलचे नाव असून, याबाबतचे पत्रक संस्था प्रतिनिधींना वाटण्यास देखील सुरुवात करण्यात आली आहे.
आमदार सतेज पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे की, गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया आता रीतसर सुरू झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत गोकुळच्या माध्यमातून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका मी बजावली आहे. ग्रामीण भागातील माता-भगिनी आणि शेतकरी यांचे संपूर्ण अर्थकारण हे प्रामुख्याने गोकुळवरच अवलंबून आहे. अशा संवेदनशील वेळी गोकुळ दूध संघाची सत्ता ही एकाच विचाराने आणि निष्ठेने काम करणाऱ्या चांगल्या लोकांच्या हाती असणे अत्यंत आवश्यक आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दूध संस्थेच्या माध्यमातून योग्य व्यक्तीच्या नावावर ठराव करणे गरजेचे आहे. या ठरावधारकाने होणाऱ्या निवडणुकीत गोकुळचे भविष्य सुरक्षित राहील आणि संस्था टिकेल, यादृष्टीने योग्य व खंबीर भूमिका घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पक्षाच्या आणि राजकीय मतभेदांत न अडकता गेल्या पाच वर्षांमध्ये गोकुळ अत्यंत चांगल्या व पारदर्शक पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे सांगत त्यांनी महायुतीवरही निशाना साधला. ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहोत. त्यामुळे गोकुळच्या या आगामी निवडणुकीकडे राजकीय किंवा पक्षीय भूमिकेतून न पाहता, लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताची ही व्यवस्था कशी टिकून राहील, अशाच व्यापक पद्धतीने याकडे पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच अशी व्यापक व शेतकरी हिताची भूमिका असणाऱ्या सभासदाच्या नावे आपल्या संस्थेचा ठराव करावा, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे. आजवर नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेऊन मी अनेक लढायांना सामोरा गेलो आहे आणि प्रत्येक वेळी मला तुमच्यासारख्या स्वाभिमानी सभासदांचे खंबीर पाठबळ लाभले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही आपण सर्वजण मला अशीच भक्कम साथ द्याल, असा पूर्ण विश्वास आमदार सतेज पाटील यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.
