म्युझिकल फाउंटनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर | दि. १० मे २०२६
कोल्हापूरच्या ऐतिहासिक प्रतिमेला साजेसे काम करा; पाहणी दरम्यान आ. क्षीरसागर यांच्या मनपा अधिकारी आणि ठेकेदारांना सूचना
गेल्या दोन – तीन वर्षापासून ऐतिहासिक रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभिकरणाच्या होत असलेल्या विकास कामांमुळे पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रंकाळा तलाव सुशोभीकरणासाठी निधी मंजूर केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली.
सद्यस्थितीत रंकाळा तलावात म्युझिकल फाउंटन बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या म्युझिकल फाउंटनच्या कामात आणि वापरण्यात येणाऱ्या साहित्यांच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड नको, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
“कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे हक्काचे विरंगुळा केंद्र म्हणजे रंकाळा तलाव आहे. कोल्हापूरच्या पर्यटनात भर घालणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प असल्याने तो शहराच्या वैभवात भर टाकणारा असावा. म्युझिकल फौंटनचे काम हे जागतिक दर्जाचे आणि दर्जेदारच झाले पाहिजे. त्यात तांत्रिक त्रुटी किंवा निकृष्ट साहित्य वापरले गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रातून यामध्ये चायना मटेरियल वापरले जाणार असल्याचे प्रसिद्ध झाले होते. याबाबत अधिकारी आणि ठेकेदारांना आमदार राजेश क्षीरसागर यांनी धारेवर धरले. हे काम जागतिक दर्जाचे असल्याने परदेशातून काही साहित्य मागविले जाणार असेल तर त्याचा दर्जाचा योग्य असावा. यामध्ये कोणतेही चायना मटेरियल दिसता कामा नये. आलेल्या साहित्याचे सर्टिफिकेशन करूनच त्या साहित्याचा वापर प्रकल्पात करावा, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
उपस्थित अधिकारी:
- डॉ. राजेंद्र भारुड (आयुक्त)
- रमाकांत आडसूळ (अतिरिक्त आयुक्त)
- रमेश मस्कर (शहर अभियंता)
- अभियंता फुलारे
