छ. संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाच्या जागेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली भेट; हातकणंगलेतील १७८ पूरग्रस्तांचे पुनर्वसन व स्वतंत्र महसूल सज्ज्याबाबतही सविस्तर चर्चा
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाला जागा उपलब्ध करून देण्यासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आज विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत क्रीडा संकुल, पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि महसूल विभागाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी प्रामुख्याने हातकणंगले तालुक्यातील दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या विविध प्रश्नांवर जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. बैठकीत खालील महत्त्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली:
विभागीय क्रीडा संकुलासाठी जागा
जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी मंजूर झालेल्या छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलाचे काम वेगाने सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य आणि प्रशस्त जागा तातडीने निश्चित करून ती उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली.
१७८ पूरग्रस्तांचे पुनर्वसन
हातकणंगले तालुक्यातील मौजे जुने पारगांव येथील रि. स. नं. १३०१ मधील जागा पूरग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी देण्याबाबत चर्चा झाली. यामुळे येथील तब्बल १७८ पूरग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटणार आहे.
स्वतंत्र तलाठी सज्जा
नागरिकांची प्रशासकीय कामे सुलभ व्हावीत यासाठी हातकणंगले तालुक्यातील नवे पारगांव, जुने पारगांव व निलेवाडी या गावांना स्वतंत्र महसूल (तलाठी) सज्जा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
केंद्रीय श्रमिक कार्यालयाला जागा
भारत सरकारच्या 'दत्तोपंत ठेंगडी केंद्रीय श्रमिक एवं शिक्षा एज्युकेशन बोर्ड' या कार्यालयाचे कामकाज कोल्हापुरातून सुकर व्हावे, यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली.
बैठकीला उपस्थित असणारे प्रमुख अधिकारी व पदाधिकारी:
या महत्त्वपूर्ण बैठकीला आमदार सतेज पाटील यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेलेकर, हातकणंगलेचे भूमी अभिलेख उपाध्यक्ष जयदीप शितोळे, जिल्हा परिषद सदस्या शुभांगी कुंभार, पंचायत समिती सदस्य भारत पाटील, सुरेश केसरकर, वैभव कांबळे, माजी सरपंच मोहन खोचगे यांच्यासह महसूल व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.