पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय!
कोल्हापूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष
पश्चिम बंगालसह आसाम आणि पुद्दुचेरी या ठिकाणी भाजपाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत फटाक्यांची आतषबाजी तसेच एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी 'देश का नेता कैसा हो... नरेंद्र मोदी जैसा हो', 'भारतीय जनता पार्टीचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
"विकसित भारताच्या दिशेने भाजपाचे भरीव योगदान" - खासदार धनंजय महाडिक
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, हा विजय केवळ पक्ष म्हणून नाही, तर सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विकासाभिमुख धोरणांचा विजय आहे. पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांच्या दडपशाहीला सुरुंग लावला आहे. अमितजी शहा यांनी पश्चिम बंगालच्या दहशतमुक्तीसाठी उचललेल्या खंबीर पावलांमुळेच आज तिथे सत्तांतर होऊन भाजपला संपूर्ण जनाधार मिळाला आहे.जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी आपल्या मनोगतात विजयाचे श्रेय निष्ठावान कार्यकर्त्यांना दिले. ते म्हणाले की, जनतेला आता केवळ विकास आणि सुशासन हवे आहे आणि भाजप ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटीबद्ध आहे. याप्रसंगी माजी प्रदेश सचिव महेश जाधव आणि राहुल चिकोडे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
