कोल्हापूर:
राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि छत्रपती राजाराम महाराजांची दूरदृष्टी यांचा संगम असलेल्या, लक्ष्मीपुरी येथील ऐतिहासिक 'विल्सन पुला'ने आज आपल्या सेवेची १०० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली. या सुवर्णक्षणाचे औचित्य साधून कोल्हापूरमधील विविध संस्था आणि इतिहासप्रेमींच्या वतीने पुलाचा 'शताब्दी वाढदिवस' मोठ्या उत्साहात आणि कृतज्ञता भावनेने साजरा करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी ठीक ५:०० वाजता विल्सन पुलावर या सोहळ्याला सुरुवात झाली. हिल रायडर्स एडव्हेंचर फाउंडेशन, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधिनी आणि समिट एडव्हेंचर या संस्थांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शिवसेनेचे विजय देवणे, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, अमरजा निबांळकर, उमाकांत रानिंगा, अजय दळवी, मनजित माने, चंदन मिरजकर, आसिफ मोकाशी, प्रशांत हडकर, सागर बगाडे, अजित अकोळकर आदी इतिहासप्रेमी मंडळी उपस्थित होती.
सोहळ्याच्या प्रारंभी पुलाचे विधिवत पूजन करण्यात आले. फुलांच्या माळा आणि आकर्षक रोषणाईने सजलेला हा पूल जणू आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत होता. यावेळी बोलताना उदय गायकवाड यांनी विल्सन पुलाच्या बांधकामामागची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या दळणवळणाला गती देण्यासाठी आणि शहराच्या विस्तारासाठी हा पूल उभारला होता. ब्रिटनमधील स्थापत्यशास्त्राचा प्रभाव आणि कोल्हापूरचा रांगडेपणा यांचा हा एक उत्कृष्ट नमुना असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
निवासी जिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी आपल्या भाषणात पुलाच्या मजबुतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, विल्सन पूल हा केवळ दगड-मातीचा सांधा नसून तो कोल्हापूरच्या प्रगतीचा वाहक आहे. १०० वर्षे उलटूनही हा पूल आजही तितक्याच मजबुतीने उभा आहे, हे आपल्या पूर्वजांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे यश आहे. तर विजय देवणे यांनी कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले.
केवळ उत्सव साजरा न करता, या ऐतिहासिक वास्तूचे जतन करणे आणि तिचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उपस्थितांनी यावेळी ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण करण्याचा आणि त्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा सामूहिक संकल्प केला. हिल रायर्ड्स, सार्थक क्रिएशन, विज्ञान प्रबोधनी, समिट एडव्हेंचर व इतिहासप्रेमींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पाडला. सायंकाळच्या वेळी पुलाच्या रोषणाईने कोल्हापूरचा वारसा पुन्हा एकदा उजळून निघाला होता. कार्यक्रमाचे आभार मंजित माने यांनी मानले.
