कोल्हापूर : प्रतिनिधी
"पुढील दोन दशकांसाठी देशाच्या ध्येयधोरणांचा आधार जनगणना असते. त्यामुळे या प्रक्रियेत माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणे अत्यंत आवश्यक आहे," असे प्रतिपादन राज्याच्या जनगणना संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आगामी जनगणनेच्या पूर्वतयारी बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. डांगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर 'जिल्हा जनगणना कार्यालयाचे' उद्घाटन करण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपसंचालक प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज ऑफिसर उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:
प्रशिक्षण: प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष कार्यशाळा घेऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करावे.
दक्षता: माहिती घेताना कोणताही भाग सुटणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
पूर्व-चाचणी: जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील ४५ गावांमध्ये 'प्री-टेस्ट' यशस्वीपणे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
प्राधान्य: जनगणना हे राष्ट्रीय काम असल्याने याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाबाबत डॉ. डांगे यांनी समाधान व्यक्त करत अचूक व पारदर्शक काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
