BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

शिवाजी विद्यापीठात ऑनलाईन जर्नालिझम माजी विद्यार्थ्यांचा मेळावा; लवकरच 'माजी विद्यार्थी संघटना' स्थापन होणार

 कोल्हापूर : प्रतिनिधी

"पत्रकारितेचे क्षेत्र सध्या अत्यंत झपाट्याने बदलत आहे. या बदलत्या डिजिटल युगात आणि स्पर्धात्मक परिस्थितीत टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. कल्पकता आणि उपक्रमशीलता जपली तरच आपण लोकोपयोगी पत्रकारिता करू शकू," असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी केले.


शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित 'पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझम' कोर्सच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या मेळाव्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अध्यासनाच्या माजी विद्यार्थ्यांची एक अधिकृत संघटना स्थापन करण्याचा निर्णय यावेळी सर्वानुमते घेण्यात आला. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविकात या संघटनेची गरज अधोरेखित केली. येणाऱ्या काळात विभागाला माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाची जोड मिळावी आणि त्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने ही संघटना कार्य करेल. येत्या काही दिवसांतच या संघटनेची रीतसर कार्यकारिणी निवडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळच्या सत्रात वैचारिक चर्चा आणि मार्गदर्शन झाल्यानंतर, दुपारच्या सत्रात मास कम्युनिकेशन आणि फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी दिली. यामध्ये विद्यार्थ्यांनी कविता वाचन, अभिनय आणि बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. विशेषतः फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या पारंपरिक वेशभूषेने कार्यक्रमात एक वेगळीच रंगत आणली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी वाघमोडे हिने केले. यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, अनुप जत्राटकर, जयप्रकाश पाटील यांच्यासह अध्यासनाचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर जुन्या सहकाऱ्यांची भेट झाल्याने अध्यासनाच्या परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण होते

थोडे नवीन जरा जुने