BREAKING
🔴 शेंडा पार्कमधील बांधकामांचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट; मंत्री हसन मुश्रीफ यांची पाहणी | 🔴 कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे नुकसान | 🔴 चारही पोलीस ठाण्यांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' उपक्रम; हालचालींवर करडी नजर | 🔴 जुना कळंबा नाका अपघातप्रकरणी मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा रस्ता रोको | 🔴 पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा घाट परिसरात महापालिकेकडून स्वच्छता मोहीम | 🔴 शेळेवाडीजवळ ओढ्यात पडलेली एर्टिगा; चार जणांची सुखरूप सुटका | 🔴 कागलमध्ये कथित 'लव्ह जिहाद' प्रकरणावर ग्रामस्थ आक्रमक; पोलीस ठाण्यावर मोर्चा | 🔴 आगाशिव डोंगरावर मधमाश्यांचा धोका; पर्यटकांना प्रशासनाचा इशारा | 🔴 पावसानंतर घराची भिंत व छप्पर कोसळून महिलेचा मृत्यू | 🔴 मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या न्यायालयीन संकुलासाठी प्रस्तावित जागेची कार्यवाह मुख्य न्यायाधीशांकडून पाहणी
]]>

स्मृतीचं शतक, प्रतिकाचं रेकॉर्ड आणि जेमिमाचं वादळ! न्यूझीलंडवर भारताचा दणदणीत विजय

 नवी मुंबई | काल नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवून पुन्हा एकदा सेमीफायनलची दारं उघडी ठेवली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सर्वच आघाड्यांवर प्रभावी खेळ करत 53 धावांनी न्यूझीलंडला पराभूत केलं.


पहिल्यांदा फलंदाजी करत भारताने 50 षटकांत तब्बल 340 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात स्मृती मानधना, प्रतिका रावल आणि जेमिमा रॉड्रिग्स या तिघींनी भारतीय डावाला झळाळी दिली. न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला फलंदाजीस बोलावलं, पण हा निर्णय अखेरीस त्यांच्या अंगलट आला.


मानधनाचं शतक, विक्रमांची बरसात

स्मृती मानधनाने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुळ चारली. तिच्या 95 चेंडूत 109 धावांच्या शतकी खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार होते. कव्हर ड्राईव्हपासून स्वीप शॉटपर्यंत तिचा प्रत्येक फटका आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण होता. तिच्या या खेळीमुळे महिला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत ती आता दुसऱ्या स्थानी पोहोचली असून, तिच्या नावावर 14 शतकं जमा झाली आहेत. मेग लॅनिंगच्या 15 शतकांच्या विक्रमाला ती लवकरच गाठेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.


प्रतिकाचं पहिलं शतक आणि नवीन रेकॉर्ड

मानधना बाद झाल्यानंतर प्रतिका रावलने जबाबदारी घेत संघाला मजबूत पाया दिला. तिच्या 134 चेंडूत 122 धावांच्या खेळीत 13 चौकार आणि 2 षटकार होते. हा तिचा विश्वचषकातील पहिला शतक ठरला. विशेष म्हणजे, प्रतिकाने केवळ 23 डावांत एक हजार धावा पूर्ण करत जागतिक विक्रम नोंदवला. तिच्या दमदार फॉर्ममुळे भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरमधील चिंता दूर झाल्याचं बोललं जातं.


जेमिमाचं वादळ

सामन्याच्या शेवटी जेमिमा रॉड्रिग्सने आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाहेर ठेवण्यात आलेल्या जेमिमाने या सामन्यात 55 चेंडूत 76 नाबाद धावा करत प्रभावी पुनरागमन केलं. तिच्या फटक्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि भारताची धावसंख्या 340 वर पोहोचली.


न्यूझीलंडचा संघर्ष निष्फळ

पावसाच्या व्यत्ययानंतर डीएलएस पद्धतीनुसार न्यूझीलंडला 44 षटकांत 325 धावांचं लक्ष्य मिळालं. मात्र, भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच चांगली पकड ठेवली. रेणुका ठाकूर आणि क्रांती गौडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रतिका, श्री चरणी आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. न्यूझीलंडकडून ब्रुक हॅलिडे (81) आणि इसाबेला गेज (नाबाद 61) यांनी थोडा प्रतिकार केला, पण विजयापासून संघ दूर राहिला.


सेमीफायनलकडे भारताची वाटचाल

या विजयासह भारतीय महिला संघाने सेमीफायनलकडे दमदार पाऊल टाकलं. पहिल्या दोन विजयांनंतर सलग तीन पराभव झाल्याने भारतीय संघावर दबाव होता, पण न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने आत्मविश्वास परत मिळवला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ आता स्पर्धेत पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे.


महिला क्रिकेटचा वाढता प्रभाव


पुरुष क्रिकेटवरच सारा भर असलेल्या भारतीय चाहत्यांनी आता महिला क्रिकेटकडेही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. स्मृती, प्रतिका, जेमिमा आणि हरमनप्रीतसारख्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटचा दर्जा झपाट्याने उंचावत आहे.


एकूणच, ‘मानधनाचं शतक, प्रतिकाचं रेकॉर्ड आणि जेमिमाचं वादळ’ या त्रिसूत्रीवर भारताने न्यूझीलंडला पराभूत करत सेमीफायनलची तिकिटं जवळपास निश्चित केली आहेत. भारतीय महिला क्रिकेटचा हा आत्मविश्वास आणि जिद्द आगामी सामन्यांमध्ये आणखी उंच भरारी घेईल यात शंका नाही.



थोडे नवीन जरा जुने