कोमल वखरे विशेष लेख
रक्षाबंधन हे केवळ एका धाग्याचं नातं नाही, तर ते अंतःकरणात रुजलेलं, आयुष्यभर जपलं जाणारं बंधन आहे. बहिण-भावाचं नातं हे रक्ताच्या पलीकडेही जाऊन काही व्यक्तींशी निर्माण होणाऱ्या आपुलकीचं प्रतीक आहे. असाच एक खास अनुभव माझ्या आयुष्यात आला, ज्याने मला या नात्याची खरी ताकद दाखवली.
कॉलेजच्या काळात, अजिंठा-एलोरा फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने मी आणि माझे मित्र एका मोठ्या कार्यक्रमात व्यस्त होतो. मी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत होते, पण दिवसभराच्या धावपळीत, तणाव आणि थकव्यात मला अस्वस्थ वाटू लागलं. चक्कर येत होती, आणि कोणाला काय सांगावं हे कळत नव्हतं. तेव्हा युवराज दादा, माझा कॉलेजमधील सिनियर, पण खऱ्या अर्थाने माझा दादा, माझ्या पाठीशी उभा राहिला. त्याने विचारलं, "कोमल, काय झालं? बरं वाटत नाहीये?" त्याच्या त्या साध्या शब्दांनी माझ्या मनाला आधार मिळाला.
माझी मैत्रीण सलोनी आणि दादा यांनी मला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. गाडीत बसल्यानंतरही दादाचं बोलणं थांबलं नाही. "कोमल, बरं आहे ना तू? थोड्याच वेळात घरी पोहोचू. एवढं टेन्शन घेऊ नकोस, तू किती स्ट्रॉंग आहेस!" त्याच्या शब्दांतली आपुलकी मला माझ्या खऱ्या भावापेक्षा कमी वाटली नाही. रस्त्यात गाडी थांबवून दादाने सलोनीला माझ्यासाठी मेडिकलमधून औषध आणि एनर्जी ड्रिंक आणायला सांगितलं. मी म्हणाले, "दादा, घरी औषध आहे, तू का खर्च करतोस?" तेव्हा त्याने माझ्याकडे रागाने पाहिल आणि म्हणाल, "गपचूप बस! दादा म्हणतेस आणि पैसे देऊ पाहतेस? माझं कर्तव्य आहे तुझी काळजी घ्यायचं!" सलोनी परत आली तेव्हा तिच्यासोबत औषध, एनर्जी ड्रिंक आणि माझ्यासाठी आवडीचं आइस्क्रीमही होतं. घरी पोहोचल्यावर सलोनीनेही मला घरापर्यंत आधार देत माझी काळजी घेतली.
दिवसभराच्या थकव्यातही त्यांनी माझ्यासाठी दाखवलेली ही आपुलकी माझं मन भरून आलं. युवराज दादा आणि सलोनी यांच्यासोबतचं हे नातं रक्ताच्या पलीकडे जाऊन मला माझ्या भावापेक्षा आणि बहिणीपेक्षा जवळचं वाटलं. खरंच, काही नाती अशी असतात, जी रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक खास आणि अविस्मरणीय असतात. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील एक अनमोल आठवण आहे, जी मी कधीच विसरणार नाही.
