आयोगाच्या अध्यक्षांना हटवूनच न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे : आमदार सतेज पाटील
पुणे : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सत्याग्रह आंदोलनात आमदार सतेज पाटील सहभागी झाले. यावेळी त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि शिवराज मोरे यांच्यासह ते आंदोलनात सहभागी झाले.
एमपीएससीच्या माध्यमातून राज्याची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत राज्य सरकारने संवेदनशीलतेने वागण्याची गरज आहे. सचिवांची बदली केल्यानंतर मुख्यमंत्री न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन देत आहेत. याचा अर्थ या प्रकरणात काही चूक झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे, असा दावा आमदार सतेज पाटील यांनी केला.
त्यामुळे अध्यक्षांना हटवूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या इतर मागण्याही सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
एमपीएससी ही महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित संस्था असून तिची विश्वासार्हता टिकवून ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या लढ्यात शेवटपर्यंत सोबत राहणार असल्याचा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिला.

