पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे यांना जुनी पेन्शन समन्वय संघाचा पाठिंबा
जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडे
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष-महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने जाहीर पाठिंबा दिला आहे. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसह जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही गावडे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, निवडणूक सहप्रमुख डॉ. प्रशम कोल्हे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी नागपूरहून आलेले कडू सर यांनी कौस्तुभ गावडे हे केवळ पुणे विभागापुरते मर्यादित नसून जुनी पेन्शनच्या प्रश्नावर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कौस्तुभ गावडे म्हणाले, “जुनी पेन्शन योजनेसाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी बांधवांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, ही आनंदाची बाब असून मोठी जबाबदारीही आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. जुनी पेन्शन हा केवळ निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभाचा विषय नसून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे.”
शिक्षकांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित होणे आवश्यक आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी संबंधित घटकांशी संवाद साधून प्रभावी पाठपुरावा केला जाईल. तसेच शिक्षकांच्या सेवाविषयक प्रश्नांसह विविध मागण्या योग्य व्यासपीठावर मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही गावडे यांनी सांगितले.
राज्यातील शिक्षक आणि विविध शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता, सेवाशर्ती आणि सामाजिक संरक्षण या मुद्द्यांशी ही मागणी संबंधित आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने कौस्तुभ गावडे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जुनी पेन्शनचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
यावेळी सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, संजयकुमार झांबरे, सचिन नलवडे, दत्ता पाटील, बाबा पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधाकर जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते, भरत मोजर, देविदास कठाळे आणि दत्तात्रय घुगरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
