कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील उजळाईवाडी ते कागलदरम्यान महामार्गाचे रुंदीकरण व इतर कामे सुरू आहेत. गोकुळ शिरगाव परिसरात काम सुरू असताना वारंवार अपघात होत असल्याने कामगार तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.
गोकुळ शिरगाव एमआयडीसी तसेच कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांची या मार्गावरून दररोज ये-जा असते. महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था, दिशादर्शक फलक आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दरम्यान, २२ सप्टेंबर २०२६ रोजी गोकुळ दूध संघाचे कर्मचारी कै. रामचंद्र सदाशिव पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर कामगार वर्गात नाराजी निर्माण झाली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
या मागणीसंदर्भात २४ सप्टेंबर रोजी आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जी. पी. बैरवा यांना निवेदन देण्यात आले. उजळाईवाडी येथील NHAI कार्यालयात हे निवेदन देण्यात आले.
महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने न केल्यास नाईलाजास्तव राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी लक्ष्मण पाटील, शाहीर सदाशिव निकम, व्ही. डी. पाटील, संभाजी शेलार, दत्तात्रय बच्चे, संदेश पाटील, योगेश चव्हाण, प्रविण करडे, विजयकुमार कांबळे आणि वैभव पाटील उपस्थित होते.
